|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात

प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अखेर प्रियांका गांधी-वढेरा यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची औपचारिक घोषणा बुधवारी झाली. त्यांची पूर्व उत्तर प्रदेश कॉग्रेस महासचिवपदी नियुक्ती झाली आहे. राजकारणातील त्यांच्या प्रवेशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अधिक बळ मिळेल, असे मानले जात आहे. देशात विविध ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले. दरम्यान, राहुल गांधी यांचे नेतृत्त्व अपयशी ठरल्यामुळेच प्रियांका गांधी यांना राजकारणात उतरविण्यात आल्याची बोचरी टीका भाजपने केली आहे. तर प्रियांका यांच्या राजकीय एन्ट्रीने भाजप घाबरल्याचा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

         पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेस महासचिवपदी नियुक्ती

माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या कन्या असणाऱया प्रियांका गांधी-वढेरा यांनी सक्रीय राजकारणात यावे, अशी मागणी गेले अनेक वर्ष पक्ष कार्यकर्त्यांकडून होत होती. यापूर्वी अमेठी आणि रायबरेली या लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी प्रचारात सहभाग नोंदवला होता; पण पक्षाच्या कोणत्याही पदावर त्या कार्यरत नव्हत्या. 2016मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी त्या राजकारणात सक्रीय होतील, अशी शक्यताही व्यक्त होत होती. तसेच काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणुनही त्यांच्या नावाची घोषणा होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र त्या सर्व अफवाच ठरल्या होत्या. अखेर बुधवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची पूर्व उत्तर प्रदेश कॉग्रेस महासचिवपदी नियुक्ती केली. फेब्रुवारी महिन्यात त्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. प्रियांका यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया यांची उत्तर प्रदेश पश्चिम भागातील महासचिवपदी नियुक्त झाली आहे. त्याचबरोबर गुलाम नबी आझाद यांचेही उत्तर प्रदेश महासचिवपद कायम ठेवले आहे. तर राजस्थान महासचिवपदी के. सी. वेणुगोपाल यांची नुयक्ती केली आहे. तसेच त्यांच्याकडील कर्नाटकची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे.    

 राहुल गांधी अपयशी ठरल्यामुळेच निर्णय : भाजप

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्त्व अपयशी ठरल्यामुळेच प्रियांका गांधी यांना राजकारणात सक्रीय व्हावे लागले आहे, अशी बोचरी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे. या पक्षातील सर्व महत्त्वाची पदे एकाच कुटुंबातील सदस्यांना मिळतात याचा हा पुरावा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेस पक्ष हा एका कुटुंबापुरता मर्यादीत आहे. तर भाजप हा पक्षच एक कुटुंब असल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेसमध्ये आजवर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी नेतृत्त्व केले. आता  प्रियांका गांधी यांची नियुक्ती घराणेशाहीनुसारच झाली असल्याचे ते म्हणाले.