|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बनावट फेसबूक अकाऊंटद्वारे मुलेंना धमकी

बनावट फेसबूक अकाऊंटद्वारे मुलेंना धमकी 

बांदा परिसरात खळबळ : महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

प्रतिनिधी / बांदा:

बांदा नजीकच्या गावातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींची बनावट फेसबूक अकाऊंट तयार करून त्याद्वारे त्या विद्यार्थिनींच्या अन्य मैत्रिणींना अश्लील मेसेज पाठवून धमकावण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पैकी एकीलातुझ्यासह तुझ्या मैत्रिणींची वाट लावू, अशी धमकी दिली गेल्याने महाविद्यालयीन युवती हादरल्या. याबाबत या संतप्त विद्यार्थिनींनी मंगळवारी बांदा पोलीस स्थानकात तपासणीसाठी आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.

दरम्यान, याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना गेडाम यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळीक यांना दिल्या. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत युवतीकडून तक्रार देण्यात आली नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा शहरानजीक असलेल्या गावातील एका विद्यार्थिनीचे महिनाभरापूर्वी बनावट अकाऊंट तयार करून त्याद्वारे युवतीच्या अन्य तीन मैत्रिणींना प्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आली. मैत्रिणीची फ्रेंड रिक्वेस्ट समजून अन्य मैत्रिणींनी फेसबूकवर मैत्री स्वीकारत चॅटिंग करण्यास सुरुवात केली. या चॅटिंगमध्ये संबंधित युवतीकडे त्यांचे फोटो व्हाट्सऍप नंबरची मागणी करण्यात आली. मात्र मुलींनी नंबर देण्यास नकार दिल्याने त्यांना अश्लील भाषेत धमकावण्यास सुरुवात करण्यात आली. तर यातील एका मुलीने नंबर दिला असल्याची माहिती मिळते.

कालातरांने संबंधिताच्या चॅटिंगच्या पद्धतीमुळे आपण यात अडकले गेल्याचे मुलींच्या लक्षात आले. याबाबत गेला आठवडाभर बांदा शहरात दबक्या आवाजात चर्चाही सुरू आहे. तर या संपूर्ण प्रकाराने वैतागलेल्या मुलींनी याची कल्पना नातेवाईक, महाविद्यालय बांदा पोलिसांना दिली. तसेच कारवाई करण्याबाबत महिनाभरापूर्वी अर्जही दिला. याबाबत सिंधुदुर्ग पोलीस सायबर क्राईमशीही संबंधित मुलींनी संपर्क साधून माहिती दिली. त्याचा तपासही सुरू असल्याचे पोलिसांनी सागितले. बनावट अकाऊंटद्वारे चॅटिंग सुरू असलेल्या या सर्व मुलींची माहिती संशयितास असल्याने संशयित हा महाविद्यालयातीलच असल्याचा संशय पोलीस निरीक्षक कळेकर यांनी व्यक्त केला आहे.

गेला आठवडाभरात मुलींना संबंधिताकडून मोठय़ा प्रमाणात त्रास दिला जात असल्याने तसेच उघडपणे तू आणि तुझ्या मैत्रिणींची वाट लावणार असल्याचे सांगितले गेल्याने या विद्यार्थिनींमध्ये भीती निर्माण झाली. याबाबत 20 ते 25 मुलींनी प्राचार्यांच्या कानावर ही बाब घालत बांदा पोलीस स्टेशन गाठले. त्याचदरम्यान तपासणीसाठी आलेल्या पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांचीही भेट घेतली. त्यांनी तातडीने याची दखल घेत पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळीक यांना लक्ष देण्याच्या सूचना केल्या. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याबाबत विद्यार्थी पोलीस यांच्यात चर्चा सुरू होती. याबाबत उद्या, बुधवारी पोलिसात रितसर तक्रार देण्याचा निर्णय विद्यार्थिनींनी घेतला आहे. त्यानंतरच पुढील तपासाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे कळेकर यांनी सांगितले.

Related posts: