|Thursday, June 27, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आजपासून विधिमंडळ अधिवेशन

आजपासून विधिमंडळ अधिवेशन 

राजकीय अनिश्चिततेचे सावट : 8 रोजी अर्थसंकल्प

प्रतिनिधी/ बेंगळूर

‘ऑपरेशन कमळ’च्या भीतीमुळे राजकीय अनिश्चिततेच्या छायेखाली बुधवार दि. 6 फेब्रुवारीपासून कर्नाटक विधिमंडळाचे संयुक्त अधिवेशन सुरू होत आहे. एकीकडे युती सरकार पाडण्यासाठी प्रयत्न तर दुसरीकडे सरकार वाचविण्यासाठी सुरू असलेल्या राजकीय कसरतीमुळे हे अधिवेशन गाजणार आहे. राज्यपाल वजुभाई वाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधून अभिभाषण करणार आहेत. तर अर्थखात्याची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्री कुमारस्वामी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

मकर संक्रातीपासून राज्य राजकारणात साप-मुंगूसाप्रमाणे खेळ रंगला आहे. आता काँग्रेसचे काही असंतुष्ट आमदार पक्षाशी संपर्क तोडून अज्ञातस्थळी वास्तव्यास आहेत. त्यामुळे अधिवेशन काळात या आमदारांच्या उपस्थितीवरच युती सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी आणि वाचविण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून सुरू असणारे नाटय़ावर अधिवेशनावेळी पडदा पडणार आहे.

शुक्रवार दि. 8 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पात शेतकऱयांबरोबरच विविध क्षेत्रांसाठी घसघसशीत तरतुदी केल्याचे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सांगितले आहे. तर राज्यातील दुष्काळी समस्या, पायाभूत सुविधांचा अभाव, योजना राबविण्याकडे सरकारचे दुर्लक्ष यासारख्या ज्वलंत समस्या चर्चेसाठी हाती घेऊन भाजप नेते सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण राज्यातील घडामोडींवर नजर टाकल्यास अधिवेशनात ज्वलंत समस्यांविषयी चर्चेपेक्षा राजकीय चिखलफेकच दिसून येण्याची शक्यता अधिक आहे.

निजद आणि काँग्रेस नेते परस्परांवर टीका करित असतानाच भाजप नेत्यांनी दोन्ही पक्षांना फैलावर घेण्याची तयारी केली आहे. सरकार स्थापन झाल्यापासून अनेक योजना कागदावरच राहिल्या आहेत. कर्जमाफीचा निर्णय केवळ घोषणेपुरताच राहिला आहे. या योजनेचा शेतकऱयांना लाभ झाला नाही, असे सांगून भाजप आमदार अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत.

तर दुसरीकडे भाजपच्या ऑपरेशन कमळ विरुद्ध सत्ताधारी नेते आवाज उठविण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेस नेते पक्षभेद बाजूला ठेऊन भाजपला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतील. 

काँग्रेस आमदारांना व्हीप जारी

6 फेबुवारीपासून विधिमंडळाचे अधिवेशन संपेपर्यंत काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सभागृहात सक्तीने हजर रहावे, अशी सूचना देऊन काँगेसचे मुख्य प्रतोद गणेश हुक्केरी यांनी व्हीप जारी केला आहे. बुधवारपासून बेंगळूरमध्ये अधिवेशनास प्रारंभ होत आहे. युती सरकारमधील असंतुष्ट आमदारांना गळ घालून विधानसभेत भाजप नेते अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत सर्व आमदार सभागृहात हजर रहावे यासाठी काँग्रेसने व्हीप जारी केला आहे. एखद्यावेळेस अधिवेशनाला गैरहजर राहिल्यास या आमदारांविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, आपल्या आमदारांवर विश्वास असल्याने निजदने व्हीज जारी केलेला नाही, असे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सांगितले आहे.