|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्ग महत्वाच्या शहरांना जोडणार

सिंधुदुर्ग महत्वाच्या शहरांना जोडणार 

हवाई उड्डाणाच्या आशा पल्लवित : बोली प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी : प्रक्रिया 27 फेब्रुवारीपर्यंत

असे असेल हवाई अंतर (किमीमध्ये)

सिंधुदुर्ग-मुंबई     363

मुंबई-सिंधुदुर्ग     350

सिंधुदुर्ग-पुणे       322

सिंधुदुर्ग-नाशिक  522

नाशिक-सिंधुदुर्ग  509

रत्नागिरी-मुंबई   275

मुंबई-रत्नागिरी   236

प्रतिनिधी / कुडाळ:

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी एअर रुटस्च्या ‘उडान 3.1’ अंतर्गत बोलीसाठीची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. बोली प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बोली प्रक्रिया 27 फेब्रुवारीला पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथून मुंबई, पुणे, नाशिक हवाई वाहतुकीने जोडले जाणार आहे. सिंधुदुर्ग (चिपी-परुळे) विमानतळावरून विमान कधी उडणार, याबाबत जनसामान्यांना उत्सुकता लागलेली असताना ही बोली प्रक्रिया सुरू झाल्याने सिंधुदुर्गवासीयांच्या हवाई उड्डाणाबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून व खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही बोली प्रक्रिया सुरू झाली आहे. गत गणेश चतुर्थीला चिपी विमानतळावर विमान उतरविण्यात आले होते. दुसरीकडे वीज, पाणी, रस्ते याबाबतच्या प्रक्रिया पूर्णत्वास नेत असताना सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्ग एअरपोर्टचा उड्डाण योजनेत समावेश करण्याची घोषणा केली होती.

शुक्रवारी अधिकृत घोषणा करीत सिंधुदुर्ग व रत्नागिरी विमानतळाच्या ‘उडान 3.1’ च्या अंतर्गत बोली प्रक्रिया सुरू झाली. 8 फेब्रुवारीपासून ही बोली प्रक्रिया सुरू झाली आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत ती चालणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एअर ऑपरेटर्स निश्चित होतील, असे हवाई मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

अधिसूचनेत सिंधुदुर्ग-मुंबई हे हवाई अंतर 363 किमी, तर मुंबई-सिंधुदुर्ग हे अंतर 350 किमी असेल, असे नमूद करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग-पुणे आणि पुणे-सिंधुदुर्ग हे अंतर 322 किमी, तर सिंधुदुर्ग-नाशिक हे हवाई अंतर 522 किमी, तर नाशिक-सिंधुदुर्ग हे अंतर 509 किमी आहे. रत्नागिरी-मुंबई हे हवाई अंतर 275 किमी, तर मुंबई-रत्नागिरी हे अंतर 236 किमी असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

विमानसेवा सिंधुदुर्गात सुरू झाल्यास पर्यटन व्यवसाय विकासासह स्थानिकांना रोजगार मिळेल. साहजिकच कोकणच्या विकासाला चालना मिळणार आहे.