|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आजऱयातील नाईकगल्लीत गॅस्ट्रोसदृश्य साथीची लागण

आजऱयातील नाईकगल्लीत गॅस्ट्रोसदृश्य साथीची लागण 

रूग्णांवर ग्रामीण रूग्णालयात उपचार,

प्रतिनिधी/ आजरा

शहरातील नाईक गल्लीत ग्रस्ट्रोसदृश्य साथीची लागण झाली असून बाधित रूग्णांवर आजरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्रीपासून या गल्लीतील नागरीकांना जुलाब व उलटय़ांचा त्रास सुरू झाला. सर्वच रूग्णांवर आजरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दूषित पाण्यामुळेच नागरीकांना उलटय़ा व जुलाब सुरू झाल्याची शक्यता असल्याने नगरपंचायतीने पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले असून सदर विहीरीतील पाणी उपसा केला आहे. शिवाय या विहीरीचे पाणी नागरीकांनी पिण्यासाठी वापरू नये असे आवाहन नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

नाईक गल्लीतील इंचनाळकर यांच्या घराशेजारील विहीरीचे पाणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरीक पिण्यासाठी वापरतात. या विहीरीचे पाणी वापरणाऱया नागरीकांना शनिवारी रात्रीपासून जुलाब व उलटय़ांचा त्रास सुरू झाला. शनिवारी रात्री पाच जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर रविवारी सायंकाळपर्यंत रूग्ण दाखल केले जात होते. रविवारी आणखी आठ रूग्णांना दाखल करण्यात आले असून 13 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही रूग्णांना उपचार करून घरी पाठवून देण्यात आले.

ग्रामीण रूग्णालयात खातुनबी ईस्माईल लमतुरे (वय 65), लुकमान असलम लमतुरे (22), फरवीन अहमल लमतुरे (19), बानुबी नसरदी (60), ईस्माईल महमद लमतुरे (वय 70), सुमय्या इंचनाळकर (30), जबीन अकबरअली इंचनाळकर (30), शगुप्ता रियाज इंचनाळकर (30), रेश्मा अल्ताफ तगारे (27), सानिया मोहम्मद लमतुरे (13), रहीमतबी अब्दुल लमतुरे (66), शौकत खुदबुद्दीन लमतुरे (24), खलसा कय्युम हिंग्लजकर (17) यांच्यावर उपचार सुरू असून काही रूग्णांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले.

आजरा ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक फर्नांडिस यांनी रूग्णांवर उपचार केले. गॅस्ट्रोसदृश्य साथीची लागण झाल्याने रूग्णांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष व आरोग्य समिती सभापती आलम नाईकवाडे यांनी रूग्णालयात जाऊन रूग्णांची विचारपूस करून परीस्थितीची माहिती डॉक्टरांकडून घेतली. तर नगरसेवक अभिषेक शिंपी यांच्यासह अमित खेडेकर, अशोक पोवार, विक्रम पटेकर, सुधीर नार्वेकर यांनी तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य रशिद पठाण, युवक काँग्रेसचे सरचिटणीस नौशाद बुड्डेखान यांनी रूग्णालयाला भेट देऊन रूग्णांची विचारपूस केली.

दरम्यान पाण्याच्या बाबतीत नगरपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रूग्णांच्या नातेवाईकांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून या विहीरीचे पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो. पण गेल्या काही दिवसात या विहीरींची स्वच्छता झाली नाही, नगरपंचायतीने केवळ कठडे रंगविण्याचे काम केले असून या विहरीतील पाण्यात गटर्समधील दूषित पाणी मिसळत असून याबाबत नगरपंचायतीने खबरदारी घेतली नसल्याचेही रूग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.

       विहीरीतील पाणी वापरू नका : आलम नाईकवाडे

सदर विहीरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. नगरपंचायतीने सदर विहीरीतील संपूर्ण पाण्याचा उपसा केला आहे. नागरीकांनी या विहीरीतील पाणी वापरू नये यासाठी विहीरीचे रहाट काढून ठेवण्यात आले आहेत. जोवर या पाणी नमुने तपासून पाणी पिण्यायोग्य असल्याचे अहवाल मिळत नाहीत तोवर या विहरीतील पाणी नागरीकांनी वापरू नये असे आवाहन उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे यांनी केले आहे.