|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » झुआरीनगरात सखल भू भागावर मोठय़ा प्रमाणात मातीचा भराव,

झुआरीनगरात सखल भू भागावर मोठय़ा प्रमाणात मातीचा भराव, 

प्रतिनिधी/ वास्को

झुआरीनगर येथील झुआरी इंडस्ट्रीजजवळील भागात सखल जमीनीवर मोठय़ा प्रमाणात मातीचा भराव घालण्यात आलेला असून या प्रकारामुळे नैसर्गीक आपत्तीचा धोका निर्माण झालेला आहे. या प्रकरणी आमदार एलिना साल्ढाना व स्थानिक पंचायतीने चौकशीची मागणी केली आहे. आमदार साल्ढाना यांनी या प्रकाराची शुक्रवारी पाहणी केली.

या ठिकाणी मोठय़ा भू भागावर मातीचा भराव घालण्यात आलेला असून एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर भू भाग बजवून बेकायदा प्रकार उरकण्यात आलेला असला तरी हा प्रकार कुणी केला याबाबत कुणालाच काही माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शेकडो ट्रक माती ही जमीन बुजवण्यासाठी झुआरीनगरातील रस्त्यांवरूनच गेलेली आहे. तरीही स्थानिक सांकवाळ पंचायतीलाही या मातीच्या भरावाबद्दल माहिती नाही. हा प्रकार उरण्यासाठी काही महिनी लागले असण्याची शक्यता आहे. तरीही हा प्रकार अंधारातच राहिलेला आहे. पंचायतीने या प्रकाराची पाहणी केलेली असून सदर जमीन कुणाची व मातीचा भराव कुणी घातला याची पूर्ण चौकशी करून या बेकायदा प्रकाराविरूध्द कडक कारवाई केली जावी तसेच मातीचा भराव काढून ती जमीन पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी सरपंच गिरीष पिल्ले यांनी केली आहे.

आमदार एलिना साल्ढाना यांनीही मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाच्या सदस्यांना सोबतीला घेऊन काल शुक्रवारी या भागाला भेट दिली. मातीचा भराव घालून धोक्याला निमंत्रण देण्याच्या प्रकाराविरूध्द त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. यासंबंधी मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाकडे तक्रार देण्यात येणार असून त्यानंतर हे प्रकरण चौकशीसाठी पोलिसांकडे जाईल अशी माहिती आमदार साल्ढाना यांनी दिली. सदर प्रकार अत्यंत गंभीर असून मातीच्या भरावामुळे पावसाळय़ात कोणताही धोका उद्भभवू शकतो असे त्या म्हणाल्या. असे बेकायदा प्रकार खपवून घेणे शक्य नाही. लोकांनीही अशा गैप्रकारांविरूध्द जागरूक राहावे असे आवाहन साल्ढाना यांनी केले.