|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आपला संवाद सुसंवाद होईल याची काळजी घ्या

आपला संवाद सुसंवाद होईल याची काळजी घ्या 

 

प्रतिनिधी/ म्हापसा

कधी चांगले, कधी वाईट, कधी नरम तर कधी गरम अशा पद्धतीने जीवन जगले पाहिजे. जगत असताना आपला संवाद सुसंवादात रुपांतरीत व्हावा याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, असे प्रतिपादन डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी म्हापसा येथे केले.

म्हापसा येथील लोकमित्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या मंथन व्याख्यानमालेच्या तिसऱया पुष्पात ते बोलत होते. त्यांनी ‘संवाद संपतोय का?’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. आपले पुष्प वाहताना त्यांनी काव्य आणि संवाद यांचा सुरेख मिलाफ घडवून उपस्थित श्रोतेवर्गाचे मन जिंकले. पैसै कमविण्यासाठी सततची धावपळ आणि सर्वच क्षेत्रातील जिवघेण्या स्पर्धेमुळे पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यासही वेळ मिळत नाही. जो काही वेळ मिळतो तो टीव्ही आणि मोबाईलमध्ये वाया जात आहे. पालकांच्या व्यस्त वेळामुळे मुलांना कसेही वागण्याचे, काही करण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे. मुलांना किती स्वातंत्र्य द्यायला हवे व किती वेळ द्यायला हवा याचा विचार प्रत्येक पालकाने करण्याची वेळ आली आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. यातून काही अनर्थ घडल्यास त्या मुलांच्या चुकीपेक्षा पालकांचे दुर्लक्ष अधिक जबाबदार ठरणार आहे, असे मेहेंदळे म्हणाले.

नाटक हा प्रकार सुंदर आहे. करमणूक आणि प्रबोधनाचे साधन म्हणून त्याकडे पाहता येईल. गोमंतकाने दिग्गज कलाकार या क्षेत्राला दिले. नाटक हे संवादाचेही उत्तम माध्यम आहे. कीर्तन ही कलाही संवादाचे उत्तम साधन आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये. हिंदू संस्कृती संवाद साधणारी संस्कृती आहे. जाहीरात या प्रकाराने संवादाचा चांगला उपयोग करून घेतला. त्यामुळे त्यांची प्रॉडक्ट दहापटीने अधिक खपू लागली. जाहीरातीतील संवाद मात्र खरा किती आणि खोटा किती याचे पडताळणी करण्याची गरज आहे. माहितीपटातून एखादे धरण, पूल, पुरातण वास्तू, धार्मिक, प्रसिद्ध, ऐतिहासिक स्थळे, प्रसिद्ध व्यक्ती, त्यांचे कार्य याबाबत संवाद साधण्यात येतो. यामुळे माहितीची कवाडे खुली झाली, असेही मेहेंदळे म्हणाले.

चित्रपट हे माध्यमही संवादाचे प्रभावी माध्यम आहे. हिंदी चित्रपट पाहण्यामुळे अनेकांना उत्तम हिंदी बोलता येऊ लागले आहे. चित्रपटातील अनेक लोकप्रिय गाणी प्रत्येकाच्या मनावर रुंजण घालत राहतात. त्याकाळी रेडिओ हेच संवादाचे माध्यम होते. त्यामुळे रेडिओवरील बातम्या, कार्यक्रम व खासकरून क्रिकेट स्पर्धाचे समालोचन ऐकण्यासाठी प्रत्येकजण आतूर असत. रेडिओ, दूरदर्शन यांच्या माध्यमातून लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांची गाणी जगभरातल्या लोकांना बघायला, ऐकायला मिळाली. आज सोशल मीडिया हे जागतिक संवादाचे प्रमुख माध्यम बनले आहे.

सोशल मीडियावरील संवादामुळे मात्र व्यक्तिगत संवाद मात्र दुरावत चालला आहे. माणसांचे एकमेकांशी बोलणे कमी झाले आहे. मोबाईलचा उपयोग किती करावा याचाही विचार होणे गरजेचे आहे. संवाद हा आपल्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा घटक असून तो सुसंवाद घ्यावा यासाठी प्रत्येकाने झटायला हवे, असेही शेवटी बोलताना डॉ. विश्वास मेहेंदळे म्हणाले.