|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » उंडिर मलनिस्सारण प्रकल्पासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान

उंडिर मलनिस्सारण प्रकल्पासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान 

वार्ताहर/ मडकई

जगातील सर्वात उत्कृष्ट अशा आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणेचा वापर करून उंडिर येथील मलनिस्सारण प्रकल्प राबविला जाईल. उंडिर वासियांबद्दल आपल्या मनात नितांत आदर व प्रेम आहे. त्यांनी या प्रकल्पासाठी आपल्याशी चर्चा करावी. त्यांच्या हितासाठीच हा प्रकल्प आहे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर  यांनी केले.

 एकूण 33 हजार चौ. मिटरचा भुखंड येथील विविध विकासाच्या प्रकल्पांसाठी ताब्यात घेतला आहे. त्यापैकी 10 हजार चौ. मिटरच्या जमिनीत मलनिस्सारण प्रकल्प राबविला जाईल. उर्वरीत जागेत सभागृह, बालोद्यान, बांदोडा विविध कार्यकारी विकास सेवा संस्थेसाठी कार्यालय व गोदाम, छोटे मैदान, महिला गटांच्या उत्पादनांसाठी वस्तू विक्री केंद्र तसेच या प्रकल्पात स्थानिकांसाठी नोकऱया राखीव ठेवल्या जातील अशी माहिती मंत्री ढवळीकर यांनी पुढे बोलताना दिली.

रामनाथी पाटो येथील साकव, सरंक्षक भिंत व पदमार्ग अशा विविध विकासकामांच्या पायाभरणी सोहळयात ते बोलत होते. यावेळी बांदोडाच्या प्रभारी सरपंच सलोनी गावडे, सार्वजनीक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंते विजयकुमार वेरेकर, अधिक्षक अभियंते राजेंद्र कामत, कार्यकारी अभियंते संजय वझे, साहाय्यक अभियंते देवेंद्र वेलिंगकर, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, दुर्भाट आडपई आगापूरच्या सरपंच सरोज नाईक, मडकईच्या सरपंच दीपा नाईक, स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार रोहिदास नाईक, पंचसदस्य अजय नाईक, कविता नाईक, साईशा नाईक, वामन नाईक, भास्कर नाईक, राजेश नाईक, रामचंद्र नाईक, विशांखा गावडे आदी व्यासपिठावर उपस्थीत होते.

2005 सालापासून रामनाथी पाटोसारखे पोर्तुगिज कालीन साकवाचे निरीक्षण केले होते. त्यातील तीन साकवांची दुरूस्तीही करण्यात आली. रामनाथीचा हा साकव धोकादायक वळणावर असलेली घरे व अंरूद रस्त्यामुळे वाहतुकीला अडचणीचा ठरत होता. ही समस्या सोडविण्यासाठी घरमालकांनी सहकार्य केले. शेती बांधाच्या विकासासाठी येथील शेतकऱयांनी सहकार्य केले आहे. म्हणून येथील रूंद रस्ते व नवीन व्यापक स्वरूपातील साकव पदमार्ग ही विकासात्मक कामे हाती घेता आली. पारपती वाडय़ावर जाण्यासाठी असलेले धोकादायक वळण त्यावर उपाययोजन आखलेली आहे. रवळनाथ मंदिराकडील मेघ:शाम च्यारी, माजी सरपंच आनंद नाईक, राजीव गांधी कलामंदिराचे उपाध्यक्ष अजित केरकर या सर्वानी स्वत:हुन घरासमोरची जागा रस्त्यांच्या रूंदिकरणासाठी दिलेली आहे. रमानाथ रोहिदास नाईक, अतूल नाईक यांच्या सहकार्यामुळेही हे शक्य झाले. तसेच लग्न समारंभावेळी रामनाथी व कवळे येथे वाहतूक कोंडी होत असते. त्यावर उपाय योजना करताना गाळशिरे ते सरस्वती विद्यालय व कवळे ते वेळप असे पर्यांयी दोन रस्ते बांधले जातील त्याचे नियोजनही करण्यात आले आहे. लवकरच या कामांना प्रारंभ केला जाईल या विकासासाठी कवळेचे सरपंच राजेश कवळेकर यांनी उत्तमरित्या सहकार्य केले आहे, असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

 फर्मागुडीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्याचे सौंदर्यीकरण करून त्याला नवा साज चढविला जाईल. त्यासाठी रू. 18 कोटी खर्च अपेक्षित आहे. वाहतुकीच्या दृष्टीकोनातून उड्डाण पुलाचेही बांधकाम लवकरच हाती घेतले जाईल. स्वातंत्र्यपूर्व काळात गोव्यात लोकसंख्या 6 लाख 75 हजार होती. सध्या 15 लाखांवर ती पोचली आहे. तशीच वाहनांची संख्या 76 हजारांवरून 12 लाख 36 हजारावर गेली आहे. वाढती लोकसंख्या व वाहनांमुळे भविष्यासाठी रस्त्यांचे नियोजन करावे लागेल. जनतेने अशा गोष्टींना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

 रोहिदास नाईक म्हणाले, शिक्षकी पेशात असताना 33 वर्षापूर्वी आपण हा रामनाथीचा भाग पायी तुडविला आहे. त्यामुळे हा भाग ओळखीचा झाला आहे. विद्यमान स्थीतीत मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विकास साधताना जे तंत्र वापरलेले आहे, ते निश्चिततच कौतुकास्पद आहे. विकास हा माणसासाठी असतो. माणसांचे राहणीमान उंचावलेले आहे. जनतेच्या हितासाठी असलेला विकास कसा असावा याचा नमूना रामनाथी गाव पाहिल्यानतंर कळून येते.

  सलोनी गावडे म्हणाल्या, मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याप्रमाणे येथील नागरिकांचेही अरूंद असलेल्या साकवाचे रूंदीकरण व्हावे असे स्वप्न होते. धोकादायक वाहतुकीपासून सुरक्षितता मिळवण्यासाठी रस्तेही रूंद झाले पाहिजेत. मात्र मंत्री सुदिन ढवळीकर यांनी या समस्यावर मात करून सुंदर अशा विकासाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

  स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी अभियंते संजय वझे यांनी केले. सार्वजनीक बांधकाम खात्यातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध विकासकामांची त्यांनी माहिती दिली. वृदांवन इंजिनीयर्स कॉन्ट्रक्टर इंडिया लि.च्या के. के. एस. चे श्रीधरन नायर व व्यवस्थापकीय संचालक अनिल नायर यांना या कामाचे कंत्राट मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

 मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या व अन्य मान्यवरांच्याहस्ते फलकाचे अनावरण व दीप प्रज्ज्वलीत करुन करण्यात आले. सूत्रसंचालन देवेंद्र वेलिंगकर यांनी तर कविता नाईक यांनी आभार व्यक्त केले.