|Sunday, October 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कलेतील थोर हुकुमशाही!

कलेतील थोर हुकुमशाही! 

मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये दिवंगत चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या चित्रप्रदर्शनावेळच्या भाषणात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातील कारभाराच्या विरोधात आवाज उठविल्याने ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांचे भाषण आयोजकांनी थांबवले. याविषयावरून कलाक्षेत्रात वादळ उठले आहे. शिवाय कलेत खोलवर रूतलेले राजकारणही उघड झाले आहे. पालेकर यांनी बरवे यांच्यावर बोलण्याऐवजी औचित्यभंग केल्याची खंत समारंभाचे अध्यक्ष चित्रकार सुहास बहुळकर यांनी व्यक्त केली आहे. तर चित्रकारांचेच नुकसान होणार असल्याने आपण बोललो आणि निषेधाचे स्वातंत्र्य आहे की नाही? असा प्रश्न पालेकर यांनी केला आहे. भाजप नेते विनय कटियार यांनी पालेकर यांना पद मिळाले नाही म्हणून ते मोदींवर टीका करत असावेत असे तर भाजप प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी टीका करायची असेल तर राहूल गांधींच्या सारखा स्वतःच्या पैशाने हॉल बुक करावा आणि तेथे पाहिजे तर शिव्या घालाव्यात, सरकारी पैशाने, सरकारी समारंभात अशी टीका खपवून घेणार नाही अशी भूमिका घेतली. चित्रकलेच्याच नव्हे तर अभिव्यक्तीच्या प्रत्येक क्षेत्रात दोन विचारधारांमध्ये व्दंव्द सुरू आहे. हे आता लपलेले नाही. जुन्या काळापासून या संस्थांत असलेले सेक्युलर मंडळींचे वर्चस्व आणि सत्तांतरानंतर रा. स्व. संघ प्रणित संस्थांमध्ये काम करणारे किंवा वैचारिक जवळीक असणाऱया मंडळींचे नव्याने निर्माण झालेले वर्चस्व. या दोन विचारांचा वाद सतत उफाळून येतोय. कार्यक्रमानंतरच्या बातम्यांमध्ये पालेकर आणि पालेकरच सगळीकडे आहेत. बरवे कुठेच नाहीत. सगळी स्पेस पालेकरांनी खाल्ली, दुर्दैवी बरवे, अशी एका बाजुने प्रतिक्रिया आली आहे. तर पुढच्या पद्मश्री पुरस्कारासाठी तरी विचार व्हावा म्हणून पालेकरांच्या विरोधी बोलण्याचे निमित्त करून केंद्राच्या कलेतील सेन्सॉरशीपला पाठिशी घालणे सुरू आहे अशी दुसऱया बाजुने टीका सुरू आहे. वास्तविक पाहता हे प्रदर्शन तब्बल तीन महिने चालू राहणार आहे आणि पालेकरांनी टीका करताना हे या इमारतीतील शेवटचे भव्य प्रदर्शन असल्याचे वक्तव्य केल्याने नेहमी येणाऱया कलारसिक आणि अभ्यासकांहून अधिकांची गर्दी या प्रदर्शनाला होईल यात शंकाच नाही. पण, काही मुद्यांचा गांभिर्याने विचार केला पाहिजे, तो म्हणजे, नॅशनल गॅलरी फॉर मॉडर्न आर्टच्या मुंबईतील पाच मजली इमारतीतील चार मजल्यांचे संग्रहालय करण्याचा खटाटोप केंद्र सरकारने का केला आहे? नवनवी भव्य प्रदर्शने त्यामुळे बंद होतील, त्याचे काय? याला पालेकरांनी थेट त्या संस्थेच्या इमारतीत येऊन विरोध करणे औचित्यभंग ठरते का? आधीच या इमारती समोर एक म्युझियम आहे. आणि चित्र, शिल्पकारांसाठी मुंबईत पुरेसी जागा मिळत नाही. बरवे यांचे प्रदर्शन त्यांच्या मृत्यूनंतर 24 वर्षांनी भरले आहे. म्हणजेच चित्रकारांना पुरेशी जागा नसताना त्यातील चार मजले म्युझियम करून प्रत्येक तीन महिन्यांनी या इमारतीत भरविल्या जाणाऱया उत्तमोत्तम चित्र प्रदर्शनांची कायमची गळचेपी होणार आहे. या प्रदर्शनाबाबतचे निर्णय मुंबईतील स्थानिक पातळीवरील तज्ञांची सल्लागार समिती घ्यायची. ती चार महिन्यांपूर्वी रद्द करून केंद्र सरकारने सगळे निर्णय आपल्या हाती घेतले आहेत. त्यामुळे छोटय़ाशा जागेत प्रदर्शन कोणाचे भरणार हे दिल्लीच्या हस्तक्षेप, मेहरबानीने ठरणार आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्र, शिल्पकारांचे काम पाच मजले भरून पाहण्याची संधी मिळत होती ती कायमची बंद होऊन गॅलरीकडील ठेवणीतील चित्रेच कायम पहावी लागणार आहेत. जागतिक दर्जाची चित्रे पाहण्यासाठी रसिकांना फ्रान्समध्ये जाणे शक्य नाही. पूर्वी रोदिन, पिकासो अशा आंतरराष्ट्रीय चित्रकारांची चित्रे लष्कराच्या कडेकोट बंदोबस्तात आणून याच नॅशनल गॅलरीत रसिकांना दाखवली गेली आहेत. पण, आता हे सर्व बंद होणार आहे. याविरोधात जे चित्रकार आवाज उठवू शकणार नव्हते त्यांचा आवाज अमोल पालेकर बनले हे लक्षात घेतले पाहिजे. पालेकर हे स्वतः एक चित्रकार आहेत. ते बरवे यांच्यावर बोलण्यापूर्वी त्यांना रोखले गेले. आयुष्यभर माणसं आणि त्यांचा जीवनसंघर्ष समजून घेण्याचाच छंद बाळगणाऱया पालेकरांनी आपल्या सहृदांवर यापूर्वी केलेले भाष्य लक्षात घेतले तर बरवे यांच्या बाबतीतही ते जे बोलले असते तो एक दस्तऐवज बनला असता. रसिक या पर्वणीला मुकले ते दुसऱयाचे बोलणे सहन न होणाऱयांनी त्यांना रोखले म्हणूनच! बहुळकर, ठेकेदार जैसल ठक्कर व अधिकारी कितीही समर्थन करोत त्यांना सहन होत नव्हते हे उघड झाले आहे. अमोल पालेकर यांच्यावरील टीका ते आजच या विषयावर बोलत असते तर मानलीही असती. पण, काँग्रेस काळातही ते सेन्सॉरशीपबद्दल कठोर भाष्य करत होते. तेव्हा ते काँग्रेस विरोधात बोलत होते की सरकारी धोरणा विरोधात? उठसूठ प्रत्येक टीका म्हणजे मोदींवरचा हल्ला समजून जिवाचा आटापिटा करणाऱयांनी हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. पालेकर यांना बोलण्याचा हक्क आहे, कारण वयाच्या 75 पैकी 50 वर्षे त्यांनी कलेला दिली आहेत. नव्याने येणाऱयांच्या आणि कलेच्या हितासाठी ते स्पष्ट बोलले. त्यावेळी कलेतील व्यवहार जपणारे ज्येष्ठ, श्रेष्ठ चित्रकार गप्प बसून राहिले तर ज्यांच्या मनात खदखद होती त्या नव्या चित्रकार आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे म्हणणे डोक्यावर घेतले. त्यांच्या टाळय़ांचा प्रभाव म्हणूनच पालेकर यांना रोखले गेले. सहन न होणाऱयांचे कलेचे राजकारण यातून उघड झाले. औचित्याचा मुद्दा हाच आहे की, सरकारला प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप का करावा वाटतोय? अभिव्यक्तीच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना विरोध का होतोय? पालेकरांनी बरवेंच्या शैलीवर बोलायला आर्ट स्कूलमध्ये बोलवा. कलादालनात कलेच्या हितावर चर्चा ही होणारच. ती राजकारण्यांना न खपणे ठीक. पण, काही कलाकार, ठेकेदार आणि नोकरशहांना न खपावी म्हणजे, ही कलेतील थोरच हुकुमशाही ठरावी!