|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » उद्योग » बँकांच्या बुडीत कर्जामध्ये मोठी घसरण

बँकांच्या बुडीत कर्जामध्ये मोठी घसरण 

केंद्र सरकारकडून माहिती सादर : 9 महिन्यात बुडीत कर्जात 31 हजार कोटींची घट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात घसरण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2018 या 9 महिन्यांच्या कालावधीत बुडीत कर्जामध्ये 31 हजार कोटी रुपयांची घट होऊन ते 8,64,433 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीमध्ये बँकांची बुडीत कर्जे 8,95,601 कोटींहून अधिक होती, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी दिली.

जून 2018 आणि डिसेंबर 2018 अखेर सार्वजनिक बँकांची बुडीत कर्जे अनुक्रमे 8,75,619 कोटी आणि 8,64,433 कोटी रुपये होती. सार्वजनिक बँकांची कर्जे मोठय़ा प्रमाणात थकल्याने त्यांचे लवकरच खासगीकरण करण्यात येणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. यावर शुक्ला यांनी कोणत्याही परिस्थितीत सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले.

केंद्र सरकारने गेल्या चार वर्षात अंमलात आणलेल्या कडक उपाययोजनांमुळे आर्थिक स्थितीत सातत्याने बदल होत आहेत. बँकांची आर्थिक स्थिती खालावण्यामागील कारणे समजून घेण्याबरोबर बँकांची परिस्थिती सुधारण्याचा संकल्प, बँकांमधील भांडवली गुंतवणूक आणि सुधारणात्मक प्रयत्न यामुळे बुडीत कर्जांमध्ये घसरण पाहावयास आली आहे. मोठय़ाप्रमाणात कर्ज थकण्यास कर्ज देण्याची चुकीची पद्धत, सरकारी हस्तक्षेप, भ्रष्टाचार आणि आर्थिक सुस्ती या कारणांमुळे बँकांच्या बुडीत कर्जांचे प्रमाण वाढले होते, असेही शुक्ला यांनी स्पष्ट केले. बँकांच्या ऍसेट क्वालिटीचा आढावा घेण्यास आर्थिक वर्ष 2015 पासून सुरुवात केली. त्यानंतर बँकांचा ताळेबंद स्वच्छ करण्यास प्रयत्न केले. या सर्व प्रयत्नांमुळे कर्ज वसुली करणे सहज शक्य झाले, असेही शुक्ला यांनी सांगितले.

बुडीत कर्ज वसुलीत यश

31 मार्च 2014 रोजी एकूण बुडीत कर्ज 2,27,264 कोटी रुपये होती. ती वाढून 31 मार्च 2015 रोजी 2,79,016 कोटी रुपयांवर पोहोचली. 31 मार्च 2016 रोजी सार्वजनिक बँकांची एकूण बुडीत कर्ज 5,39,968 कोटी रुपयांवर आली. तर 31 मार्च 2017 रोजी 6,84,732 कोटी रुपयांवर पोहोचली, असे शुक्ला यांनी सांगितले. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये घेण्यात आलेल्या कडक धोरणांमुळे डिसेंबर 2018 पर्यंत सार्वजनिक बँकांच्या एकूण बुडीत कर्जांपैकी 3,33,491 कोटी रुपयांची वसुली झाली आहे.