|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » शेष भारत संघाविरुद्ध विदर्भाचे पारडे जड

शेष भारत संघाविरुद्ध विदर्भाचे पारडे जड 

प्रतिष्ठेची इराणी चषक लढत आजपासून

नागपूर / वृत्तसंस्था

रणजी चषक स्पर्धेच्या फायनलनंतर घाईघाईनेच इराणी चषक स्पर्धा घेण्याची गरज आहे का, या वादाच्या सावटात यंदाची इराणी लढत आजपासून (दि. 12) रणजी विजेता विदर्भ व शेष भारत संघात खेळवली जात आहे. दिलीप वेंगसरकर यांनी दोनच दिवसांपूर्वी या घिसाडघाईबद्दल बीसीसीआयवर कडाडून टीका केली. एखादी स्पर्धा उरकून टाकण्याची ही घाई मूळ उद्देशावरच पाणी फिरवत आहे, असे ते म्हणाले. अर्थात, दुसरीकडे, विदर्भचा संघ जेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असून यात यश आल्यास असा पराक्रम करणारे तो मुंबई व कर्नाटकनंतर तिसरा संघ ठरणार आहे.

रणजी चषक स्पर्धेत जवळपास तीन महिने ठरावीक अंतराने सलग सामने खेळवले जातात. खेळाडू यामध्ये अक्षरशः थकलेले असतात. त्यातच रणजी चषक स्पर्धेची फायनल झाल्यानंतर काही दिवसातच इराणी चषक आयोजित केली जाते. त्यावर वेंगसरकर यांनी टीका केली. या दोन्ही स्पर्धादरम्यान पुरेसा अवधी असावा, असे मानणारा मोठा गट आहे.

दरम्यान, प्रत्यक्ष लढतीत विदर्भ संघाचा मुख्य फोकस वासिम जाफरवर असेल. या लढतीनंतर आपण आपल्या क्रिकेट वाटचालीविषयी निर्णय जाहीर करत असल्याचे वासिम जाफरने यापूर्वी म्हटले होते. रणजी हंगामात 1 हजार धावांचा टप्पा दोनवेळा सर करणारा जाफर यंदा इराणी चषक स्पर्धेतील शेवटच्या दिवशी 41 व्या वर्षात पदार्पण करेल. त्याने इराणी चषक स्पर्धेत सर्वाधिक 1294 धावांचा विक्रम रचला असून येथील दोन डावात तो त्यात आणखी भर घालू शकेल. इराणी चषक स्पर्धेत तीन संघांकडून खेळणाऱया तीनपैकी तो एक खेळाडू असून इराणी चषकात सर्वाधिक प्रतिनिधीत्व करण्याच्या अशोक मंकड यांच्या 13 सामन्यांच्या विक्रमाशी तो बरोबरी करेल. आजवर येथे त्याने इराणी चषकात 3 शतके झळकावली असून वेंगसरकर व गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या 4 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी त्याला एका शतकाची गरज आहे.

इराणी चषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रमही जाफरच्या खात्यावरच असून मागील हंगामात त्याने या व्यासपीठावर 286 धावांची तुफानी खेळी साकारली होती. त्याच्या खेळीमुळेच विदर्भला 7 बाद 800 अशी सांघिक सर्वोच्च धावसंख्या उभारता आली होती. त्यानंतर रजनीश गुरबानी व आदित्य सरवटे यांनी एकत्रित 7 बळी घेत विदर्भला पहिल्या डावाअखेर आघाडीच्या निकषावर जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

अर्थात, ती लढत हनुमा विहारीच्या संघर्षमय खेळीसाठी देखील ओळखली गेली. कसोटी क्रिकेटपटू बनण्याचा मार्ग त्याच्यासाठी या सामन्यामुळेच सोपा झाला. रविचंद्रन अश्विन बाद झाल्यानंतर शेष भारत संघ 6 बाद 98 अशा बिकट स्थितीत होत आणि फॉलोऑनचे संकट त्यांच्यासमोर आ वासून उभे होते. पण, विहारी व जयंत यादव यांनी 216 धावांची भागीदारी साकारत संघर्ष साकारला. विहारीने शेवटच्या गडय़ाच्या रुपाने बाद होण्यापूर्वी 23 चौकार व 3 षटकारांसह 183 धावांचे योगदान दिले. याही पेक्षा महत्त्वाचे म्हण्जे त्याने चक्क 477 मिनिटे खेळून काढली. आताच्या घडीला त्याने 4 कसोटी सामने खेळले असून भविष्यातही त्याच्याकडून अनेक अपेक्षा आहेत.

गत हंगामात शेष भारत संघाचे नेतृत्व करुण नायरकडे होते. यंदा मात्र तो या संघात नाही. इराणी स्पर्धेत 78.77 च्या सरासरीने विक्रमी 709 धावा करणारा अजिंक्य रहाणे यावेळी शेष भारत संघाचा कर्णधार असेल. वर्ल्डकपसाठी रहाणे शर्यतीत असेल, असे एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले असल्याने रहाणेचे त्याचे बऱयाच प्रमाणात मनोबल उंचावलेले असणार आहे.

संभाव्य संघ

विदर्भ : फैज फैजल (कर्णधार), संजय रघुनाथ, वासिम जाफर, मोहित काळे, गणेश सतीश, अक्षय वाडकर, आदित्य सरवटे, अक्षय कर्णेवर, अक्षय वखरे, उमेश यादव, रजनीश गुरबानी.

शेष भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मायंक अगरवाल, अनमोलप्रीत सिंग, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, इशान किशन, श्रेयस अय्यर, धमेंद्रसिंह जडेजा, रोनित पटेल, श्रेयस अय्यर, अंकित रजपूत, एस. संदीप वारियर, आरके सिंग, तनवीर उल हक, हनुमा विहारी.

बेळगावच्या रोनित मोरेला अंतिम संघात संधी शक्य

बेळगावचा मध्यमगती गोलंदाज रोनित मोरेचा या प्रतिष्ठेच्या लढतीसाठी शेष भारत संघात समावेश असून अंतिम 11 सदस्यीय खेळाडूतही त्याला संधी मिळू शकेल, असे संकेत आहेत. सौराष्ट्राचा कर्णधार, अनुभवी जयदेव उनादकटला शेष भारत संघातून आश्चर्यकारकरित्या वगळले गेले असून यामुळे गोलंदाजीची धुरा युवा खेळाडूंवर असू शकते. या पार्श्वभूमीवर रोनित मोरे व डावखुरा फिरकीपटू धमेंद्रसिंह जडेजा शर्यतीत असतील. कृष्णप्पा गौतम व राहुल चहर हे अन्य दोन फिरकीपटू उपलब्ध आहेत. याशिवाय, अंकित रजपूत, तनवीर-उल-हक, संदीप वारियर जलद गोलंदाजीतील मोहरे असणार आहेत.