|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » उधळेनजीक अपघातात एकजण जागीच ठार

उधळेनजीक अपघातात एकजण जागीच ठार 

प्रतिनिधी/ खेड

मुंबई-गोवा महामार्गावरील उधळेनजीक सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास स्विप्ट डिझायर आणि अल्टो कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात अल्टो कारचालक घन:श्याम रामकृष्ण जुवेकर (55, अंबरनाथ-मुंबई) हे जागीच ठार झाले. या अपघात चौघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  अनुराधा घनश्याम जुवेकर (50), दिलवेश घनश्याम जुवेकर (31), अवनी घनश्याम जुवेकर (25, तिघेही अंबरनाथ-मुंबई) व स्विप्ट कारचालक समाधान गजानन पवार (43) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. घनश्याम जुवेकर हे  अल्टो कारमधून पत्नी अनुराधा, मुलगा दिलवेश, मुलगी अवनी यांच्यासमवेत मुंबईहून खेडच्या दिशेने येत होते. ते उधळेनजीक आले असता गुहागरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱया समाधान पवार यांच्या स्विफ्ट कारशी समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही कारच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. यामध्ये घनश्याम जुवेकर यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी जुवेकर कुटुंबियांना शहरातील मधुसिद्धी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले, तर पवार यांना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड, पोलीस कर्मचारी रवींद्र बुरटे, मंगेश शिगवण, कोटकर यांच्यासह मदत ग्रुप, स्वयं टीमचे पथक अपघातस्थळी दाखल झाले व गंभीर जखमी प्रवाशांना उपचारार्थ हलवण्यासाठी मदतकार्य केले. या अपघाताचा पोलिसांनी पंचनामा केला असून रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.