|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » चंद्रकांतदादांनी जनतेतून निवडून यावे

चंद्रकांतदादांनी जनतेतून निवडून यावे 

प्रतिनिधी/ सातारा

संसदेच्या इतिहासामध्ये गेली 50 वर्षे केंद्रीय माजी कृषीमंत्री खासदार शरद पवारसाहेब यांनी आम जनतेतून निवडून येऊन कारकीर्द गाजवलेली आहे. तुमच्यासारखे मागच्या दाराने येऊन ते मंत्री झालेले नाहीत. चंद्रकांतदादा तुमच्यातील सुप्त गुणांचा राष्ट्रवादी पक्ष आदर करतो. परंतु पवार साहेब गेली 5 वर्षे जनतेतून निवडून येत आहेत. तसे तुम्ही एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवा. नंतर शरद पवार साहेबांच्या पराभवाची भाषा करा, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी लगावला.

महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंत्रालयात पत्रकरांशी बोलताना शरद पवार साहेबांवर मंत्री टीका केली. त्यावर सुनिल माने यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या टिकेला त्याच भाषेत सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, गेली 50 वर्षे विधानसभा आणि लोकसभेवर पवारसाहेब यांना बारामती मतदार संघातून जनतेने विक्रमी मताने निवडून दिले आहे. आजपर्यंतच्या इतिहासात पवार साहेबांनी बारामती मतदार संघातून जेवढय़ा निवडणुका लढविल्या त्या निवडणुकांमध्ये त्यांना गावोगावी जाऊन त्यांना प्रचार करावा लागला नाही. जनतेच्या प्रेमापोटी प्रचार न करता ते विक्रमी मताने निवडून आले आहेत. मतदार संघाच्या पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी माढा या नवीन मतदार संघातून निवडूक लढविली. त्यावेळी सुध्दा नवखा मतदार संघ असतानाही सातारा आणि सोलापूर जिह्यातील जनतेने साहेबांना उच्चांकी मताने विजयी केले होते. याचा विसर चंद्रकांत दादा पाटील तुम्हाला पडला तर नाही ना?, खासदार शरद पवार साहेबांबद्दल तुम्हालाच काय देशातील जनतेला त्यांचा आदर आहे. त्यांचे वय झाले असले तरी त्यांच्या कामाची पद्धत काश्मिर पासून ते कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व राजकीय नेत्यांना माहिती आहे. साहेब सकाळपासून ते रात्री 12 पर्यंत जनसंपर्कांचे काम करत असतात. त्यामुळे त्यांना माढा मतदार संघातील सहाशे गावांमध्ये फिरुन प्रचार करण्याची गरज नाही. पवार साहेबांनी माढामधून निवडणूक लढवावी, हे कार्यकर्त्यांचे मत आहे. पवार साहेबांनी निवडणूक लढवणार हे आजही जाहीर केले नाही. असे असताना तुम्ही त्यांच्या पराभवाची भाषा बोलत आहात यावरुनच तुमच्या राजकारणातील परिपक्वतेची जाणीव लोकांना होत आहे.

माढामधून उमेदवारी घ्या

पवार साहेब गेली 50 वर्षे जनतेतून निवडून येत आहेत. मात्र तुम्ही पाच जिह्याच्या मर्यादित पदवीधर मतदारांमधून अवघ्या 2138 मतांनी निवडून आला आहात. येणाऱया लोकसभा निवडणुकीत माढा मधून तुम्हीच उमेदवारी दाखल करा आणि निवडून येऊन दाखवा. असा टोला सुनिल माने यांनी शेवटी लगावला.