|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे कामकाज लवकर पूर्ण करा

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे कामकाज लवकर पूर्ण करा 

वार्ताहर/ एकंबे

महाराष्ट्रातील शेतकऱयांना न्याय देण्याबरोबरच आर्थिक मदत देण्याच्या हेतूने
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना हाती घेतली आहे. या योजनेचा शेतकऱयांना त्वरित लाभ द्यायचा असल्याने, याबाबतचे प्रशासकीय कामकाज लवकरात लवकर पूर्ण करा, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी कोरेगाव तहसील कार्यालयास भेट देऊन महसूल अधिकारी व कर्मचाऱयांची व्यापक बैठक घेतली. यावेळी आढावा घेताना त्या बोलत होत्या. प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, तहसीलदार स्मिता पवार, निवासी नायब तहसीलदार श्रीरंग मदने, महसूल नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, अमर रसाळ, मंडल अधिकारी किशोर धुमाळ यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

सिंघल यांनी कोरेगाव, सातारारोड, किन्हई, वाठार स्टेशन, पिंपोडे बुद्रुक, शिरंबे, रहिमतपूर व वाठार किरोली महसूल मंडळ निहाय शेतकरी व शेतजमिनीबाबत आढावा घेतला. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी निश्चित कालमर्यादा सरकारने ठरवून दिलेली असल्याने विहित मुदतीत बिनचूक माहिती संकलित करुन, संगणकीकृत करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे तलाठी व मंडल अधिकारी यांनी बिनचूकपणे काम होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

 कीर्ती नलावडे, स्मिता पवार, श्रीरंग मदने यांनी महसूल मंडलनिहाय आकडेवारी सादर केली. तलाठी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव काटकर यांनी सात बारा संगणकीकरणच्या धर्तीवर अहोरात्र काम करुन, या योजनेचा सर्वच शेतकऱयांना लाभ मिळेल, यासाठी प्रयत्न करतील, अशी ग्वाही संघटनेतर्फे दिली.