|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेसने आरएसएसबाबतची भूमिका जाहीर न केल्यास आघाडी फिसकटली – प्रकाश आंबेडकर

काँग्रेसने आरएसएसबाबतची भूमिका जाहीर न केल्यास आघाडी फिसकटली – प्रकाश आंबेडकर 

ऑनलाईन टीम / नाशिक :

काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीला एकमेकांशी युती करायची आहे. मात्र काँग्रेस आरएसएसबाबत आपली भूमिका जाहीर करत नसल्याने आघाडीची बोलणी फिसकटली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे एमआयएमशी संगत करून भविष्यात वंचितांना सत्तेत आणण्यासाठी आपला लढा सुरूच राहील असे आंबेडकर यांनी मालेगाव येथील मेळाव्यात म्हटले आहे. आंबेडकर यांनी लोकसभेच्या धुळे मतदार संघासाठी वंचित आघाडीच्यावतीने इंजिनिअर कासमी मोहम्मद कमाल हाशमी यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी मालेगावच्या कार्यकर्त्यांनी एक लाख रुपयांचा पक्षनिधी आंबेडकर यांच्याकडे सुपुर्द केला. या सभेलाही खासदार असदुद्दीन ओवेसी यांची अनुपस्थिती खटकणारी होती.

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर महाआघाडीबाबत झालेली चर्चा निष्पळ ठरली होती. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीतून कोणताच तोडगा निघाला नव्हता. आघाडीबाबत चर्चा पुढे सरकली नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी बैठकीनंतर म्हटले होते. पण आंबेडकर आघाडीत सहभागी होतील याबाबत आपण आशावादी असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले होते. संघाने देशात समांतर व्यवस्थापन राबवले आहे, त्याऐवजी घटनात्मक व्यवस्थापन असावे अशी आमची मागणी असल्याचे आंबेडकरांनी तेव्हा म्हटले होते. घटनात्मक व्यवस्थापनाबाबत काँग्रेसची स्पष्ट भूमिका असेल तरच चर्चा पुढे सरकेल असेही त्यांनी नमूद केले होते. याआधी प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेससाठी आजही दरवाजे खुले आहेत. असेही त्यांनी म्हटले होते. पण काँग्रेसशी युती झाली तरी आम्ही एमआयएमला सोडणार नाही असे देखील त्यांनी म्हटले होते. शरद पवार सेक्मयुलर आहेत पण त्यांचा पक्ष नाही. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जाणे मंजूर नसल्याचे त्यांनी म्हटले होते.