|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्राथमिक शिक्षक बदली आदेश जारी

प्राथमिक शिक्षक बदली आदेश जारी 

तांत्रिक घोळात अडकली यादीची प्रसिद्धी : शिक्षकांचा जीव टांगणीला

प्रतिनिधी / ओरोस:

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला अखेर मुहुर्त मिळाला आहे. शासनाने शिक्षक बदलीचा आदेश जारी केला आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पोर्टलवर ही बदली यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 15 रोजी ही यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही यादी उपलब्ध होऊ शकली नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान पसंतीचा विकल्प शिल्लक न राहिल्याने अनेक शिक्षकांना खो मिळण्याची शक्यता आहे. अशा शिक्षकांना पुन्हा विकल्प भरून देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेमुळे बदलीच्या रडारवर असलेल्या सुमारे दोन हजार शिक्षकांचा जीव टांगणीला लागला असून बदली ठिकाणाच्या स्पष्टतेसाठी त्यांना आणखी काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शासनाने प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात बदल केला असून सुगम आणि दुर्गम क्षेत्राच्या वर्गीकरणानुसार ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी मागवून घेण्यात आलेल्या अर्जांनुसार या बदल्या झाल्या आहेत. मागील दोन वर्षे काही कारणांमुळे बदली प्रक्रिया खोळंबली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही ही बदली प्रक्रिया खोळंबण्याची अटकळ बांधण्यात येत होती. मात्र बऱयाच गाजावाज्यानंतर टप्पा क्रमांक चारपर्यंतची प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया शासनाने पूर्ण केली आहे. याबाबतचे आदेश 14 फेब्रुवारी रोजी निर्गमित झाले आहेत.

पालघर वगळता कोकण विभागातील सर्व जिल्हय़ांतील शिक्षकांच्या शासन स्तरावरून झालेल्या या बदल्यांची यादी संबंधित जिल्हय़ांच्या ‘सीईओ लॉग इन’ ला 15 रोजी उपलब्ध होईल. ती यादी जिल्हा व तालुकास्तरावर प्रसिद्ध करून विकल्प शिल्लक न राहिल्याने खो मिळालेल्या शिक्षकांनी 16 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुन्हा नव्याने विकल्प भरून द्यावेत, असेही सूचित करण्यात आले होते.

  दरम्यान 15 रोजी सायंकाळी उशिरापर्यंत ही यादी पोर्टलवरच उपलब्ध न झाल्याने प्रसिद्ध होऊ शकली नाही. त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना त्याच्या बदलीचे नेमके ठिकाण समजू शकले नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांचा हिरमोड झाला. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही यादी प्रसिद्ध होण्यास विलंब होत आहे. तांत्रिक बिघाड दूर होताच यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून पाचव्या टप्प्यासाठी विकल्प भरण्याची संधीही दिली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तांत्रिक बिघाडाच्या या घोळामुळे बदली  ठिकाणाच्या स्पष्टतेसाठी शिक्षकांना आणखी काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Related posts: