|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » पुणेकर जागवणार काश्मिरमध्ये राष्ट्रीय अस्मिता

पुणेकर जागवणार काश्मिरमध्ये राष्ट्रीय अस्मिता 

पुणे / प्रतिनिधी:  पुण्यातील सृजन कॉलेज ऑफ डिझाईन, आम्ही पुणेकर, जिल्हा परिषद, रियासी-जम्मू आणि जनरल जोरावर सिंग शैक्षणिक आणि चॅरीटेबल ट्रस्ट – जम्मू कश्मीर यांच्या संयुक्त पुढाकारातून काश्मीरच्या इतिहासातील शूर योद्धया जनरल जोरावर सिंग यांच्या जीवनावर थ्री डी लघुपट बनविण्यात येत असून त्याच्या पोस्टर चे प्रकाशन नुकतेच जम्मू येथील रियासी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात नुकतेच प्रकाशित करण्यात आले.

जनरल जोरावर सिंग यांच्या पराक्रमामुळे जम्मू काश्मीर हे राज्य भारताशी जोडले आहे. भारतीय संस्कृतीशी जोडलेली हि पराक्रमाची गाथा 3 डी लघुपटाची हि प्रेरणादायी गाथा सृजन कॉलेज ऑफ डिझाईन चे विद्यार्थी निर्माण करणार आहे. प्रत्यक्ष उपक्रमातून शिक्षण देणाऱया सृजन कॉलेज ऑफ डिझाईन ने यापूर्वी जगातले पहिले थ्री डी ऐतिहासिक चरित्र ‘शिवतेज संभाजी’ यासारख्या काही निर्मिती केल्या आहेत. वीर योद्धा जनरल जोरावर सिंग हा थ्री डी लघुपट रियासी मधील भीमगड या किल्ल्यावर नियमित पणे प्रदर्शित केला जाणार असून वैष्णवदेवी, जम्मू काश्मीर, शिवाखोरी येथे जाणाऱया पर्यटकांसाठी हि एक वेगळी पर्वणी असणार आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना जम्मू काश्मीर मधील रियासी जिल्हाचे जिल्हा अधिकारी श्री सागर डोईफोडे म्हणाले कि या उपक्रमामुळे जम्मू काश्मीरच्या इतिहासाला पुर्नजीवन मिळणार आहे. या भागाचा भारताशी असलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधाला उजाळा मिळणार आहे. पर्यटनाच्या वाढीच्या प्रयत्नातुन राष्ट्रीय भावनेला चालना मिळेल.

जनरल जोरावर सिंग यांचे वंशज राजाजी कल्थूरिया आणि दीक्षा कल्थूरिया यांनी डोग्रा संस्कृती हि भारतीय असल्याचा अभिमान बाळगणारी आहे. त्याचा वारसा जपताना जनरल जोरावर सिंग यांचा इतिहास प्रेरणा देणार आहे या चित्रपटामुळे पुढील पिढीस आदर्शवादाचे मार्गदर्शन मिळणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या उपक्रमासाठी जनरल जोरावर सिंग शैक्षणिक व चरिटेबल ट्रस्ट सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत.

सृजन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी प्रत्यक्ष जम्मू कश्मीर ला भेट दिली असून तेथील इतिहासकार, ऐतिहासिक वास्तू यांना भेटी दिल्या आहेत. प्रत्यक्ष शिक्षण घेत असतानाच व्यावसायिक काम करण्याची संधी आम्हाला सृजन कॉलेज डिझाईन मध्ये शिकत असल्याने नेहमीच मिळत असते मात्र यावेळेस एक फार मोठा विषय हाताळण्याची संधी आम्हाला मिळत असून एक उत्तम निर्मिती करून दाखविण्याचे आमचे ध्येयं असल्याची प्रतिक्रिया सृजन मधील विद्यार्थी केशर कुंभवडेकर, सायली खेडेकर, पूजा कोळेकर, आदित्य घोडके, आकांक्षा इनामदार, रविराज वायदंडे, उत्कर्ष जाधव, स्वप्नील गोपाळे, संकेत मांगले, मानसी जगताप, तुषार पाटील आदी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या उपक्रमात सृजन कॉलेज ऑफ डिझाईन चे 35 हून अधिक विद्यार्थी काम करणार आहेत. सृजन कॉलेज चे कार्यकारी संचालक संतोष रासकर, अश्विनी शिंदे, अमर साखरे, अनुराग त्यागी, सौरभ गुंजाळ आदी प्रशिक्षक या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

शिक्षण आणि शिकविण्याची पद्धत याचा एक वेगळा आदर्श पायंडा सृजन कॉलेज ऑफ डिझाईन ने यापूर्वीच घातला आहे. आजवर केलेल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शैक्षणिक संधी निर्माण झाल्या आहेत. वीर योद्धा जनरल जोरावर सिंग यांच्या जीवनावर आम्ही बनवत असलेल्या या 3 डी लघुपाटामुळे जम्मू कश्मीर मधील तरुणांमध्ये राष्ट्रीय अस्मिता जागविण्यासाठी आम्हाला प्रयत्न करता येणार असल्याचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया सृजनचे कार्यकारी संचालक संतोष रासकर यांनी यावेळी व्यक्त केली. या उपक्रमात आम्ही पुणेकर हि संस्था देखील सहकार्य करत आहे. सृजन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी यशस्वी केलेल्या उपक्रमांना पाहता या उपक्रमात सहभागी झाल्याचा आम्ही पुणेकर या संस्थेला अभिमान असून या निमित्ताने पुणे आणि जम्मू काश्मीर या नात्याला दृढता मिळणार असल्याची प्रतिक्रिया आम्ही पुणेकर या संस्थेचे सचिव हेमंत जाधव यांनी व्यक्त केली.

Related posts: