|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ले पोलिसांना दोन दिवसांची मुदत

वेंगुर्ले पोलिसांना दोन दिवसांची मुदत 

मोरजे मृत्यूप्रकरण : संशयितांना अटक न झाल्यास सोमवारी सर्वपक्षीय आंदोलन

मुख्य संशयितासह तिघेजण अद्याप फरारच

ग्रामस्थांनी घेतली पोलीस निरीक्षकांची भेट

कारवाई न केल्यानेच मोरजेंचा खून झाल्याचा आरोप

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

दाभोली-मोबारकरवाडी येथील भानूदास मोरजे मृत्यूप्रकरणातील मुख्य संशयित संदीप पाटील याच्यासह अन्य तिघेही संशयित पसार आहेत. याप्रश्नी भाजप मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी जिल्हय़ातील मच्छीमार पदाधिकाऱयांसह शुक्रवारी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांची भेट घेतली. संशयितांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांना 48 तासांची मुदत देण्यात आली असून शनिवारी दुपारपर्यंत संशयितांना अटक न झाल्यास सोमवारी जिल्हय़ातील सर्व मच्छीमार व इतर समाजातर्फे सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दाभोली-मोबारकरवाडी येथे जमिनीच्या वादातून गुरुवारी सकाळी झालेल्या मारहाणीत भानूदास मोर्जे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुदाम मोरजे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार संशयित भाजप पदाधिकारी तथा दाभोली ग्रा. पं. चे उपसरपंच संदीप पाटील, त्यांचा भाऊ शैलेश पाटील, राजाराम उर्फ बंडय़ा कांबळी, भाई दाभोलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मच्छीमारांनी घेतली पोलीस निरीक्षकांची भेट

शुक्रवारी भाजप मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर, मच्छीमार नेते बाबी जोगी, माजी पं. स. सदस्य समाधान बांदवलकर, दादा केळुसकर, भाई मालवणकर, भाऊ मोरजे, वसंत गावकर, नरेश बोवलेकर, एकनाथ राऊळ, अमिद दाभोलकर, शेखर येरागी, किरण तोरसकर, दादा सारंग आदींनी पोलीस निरीक्षक खोत यांची भेट घेत चर्चा करीत संशयितांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन!

भानुदास मोरजे यांचा जमीनवादातून झालेला खून ही दुदैवी घटना असून जिल्हय़ातील संपूर्ण मच्छीमार समाज व अन्य समाजातील लोकही मोरजे कुटुंबियांच्या पाठीशी आहेत. संशयित संदीप पाटील याने यापूर्वीही अनेक ठिकाणी दादागिरी केली आहे. उपसरपंच गिरप यांनाही ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी मारहाण केली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याच्याविरोधात अटकेसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले होते. मात्र, त्याच्याविरोधात कोणतीही कार्यवाही न केल्याने मोरजे यांना प्राण गमवावा लागला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांना 48 तासाची मुदत देण्यात आली आहे. शनिवारी दुपारपर्यंत चारही अटक न झाल्यास जिल्हय़ातील मच्छीमार बांधव व इतर समाजातर्फे पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी तोरसकर यांनी सांगितले.

..तर मच्छीमार समाज धोक्यात!

राज्यातील सागर किनारपट्टीवर मच्छीमार समाज मोठय़ा संख्येने वसलेला आहे. तेथे असलेली घरे त्यांच्या नावावर आहेत. मात्र घराखालील जमीन दुसऱयाच्या नावावर आहेत. किनारपट्टीवरील जमिनींच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे पाटील सारखी मंडळी जमीन मालकांकडून अखत्यार पत्र घेऊन मच्छीमारांवर दादागिरी करीत आहेत. मोरजे यांचा खून जमीनवादातून झाला आहे. हा खून पचला तर संपूर्ण राज्यातील मच्छीमार समाज धोक्यात येईल, असेही तोरसकर यांनी सांगितले.