|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शिवोलीपूर्वी आसगावातही घरफोडी केल्याचे उघड

शिवोलीपूर्वी आसगावातही घरफोडी केल्याचे उघड 

प्रतिनिधी/ म्हापसा

बामणवाडा शिवोली येथील घरफोडी प्रकरणी हणजूण पोलिसांनी काल अधिक चौकशी केली असता त्या विदेशी चोरटय़ांनी तेमेर भोवतावाडा येथील फिलीमा मास्कारेन्स यांचे घर फोडून 52 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रुपये 15 हजारांची चोरी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी सोन्याच्या बांगडय़ा हस्तगत केल्या असून रक्कम अद्याप सापडलेली नाही, अशी माहिती हणजूण पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली. दरम्यान सीफॉर्म भरून न घेता हरफडे येथे विदेशी नागरिकांना घरात वास्तव्य करण्यास दिल्याप्रकरणी व्हिलेज कॉफीचे मालक आदीत अजित मोरजकर रा. हडफडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

 पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वबाजूनी चौकशी करण्यात येत आहे. जॉर्जीआ राष्ट्राचे नागरिक असलेले कॉन्सटाईन चाडझी (46), ऊरा पिरवेली (42), लाशा गुरचिआनी (46), इराकली तामलीआनी (33) हे चौघे संशयित आरोपी 4 मार्च रोजी गोव्यात आले होते. त्यांना स्थानिकांची मदत आहे काय याबाबत हणजूण पोलीस सखोल चौकशी करीत असल्याची माहिती देसाई यांनी दिली.

तेमेर आसगाव येथील फिलीमा मास्कारेन्स या 9 रोजी आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्या शुक्रवारी सकाळी घरी परतल्या असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघड झाले. गॅस कटरच्या सहाय्याने मुख्य दरवाजा, कपाट तोडल्याचे त्यांना आढळून आले. कपाटातील एक सोन्याची बांगडी किंमत 52 हजार रुपये व रोख रक्कम 15 हजार रुपये गायब झाल्याचे आढळून आले. त्यांनी याबाबत हणजूण पोलिसांत लेखी तक्रार दिल्यावर पोलिसांनी त्यांच्या घराकडे धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर अटक केलेल्या सदर चोरटय़ांची चौकशी केली असता त्यांनी या चोरीबाबत कबुली दिली. पोलिसांनी या दुसऱया घरफोडीबद्दल चारही जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला असून त्याची तपासणी वेगळी करण्यात येणार आहे, असे देसाई यांनी सांगितले.

अटक करण्यात आलेले संशयित आरोपी कॉन्सटाईन चाडझी, इराकली तामलीआनी हे दोघेजण 2017 साली गोव्यात येऊन गेले होते. त्यावेळी झालेल्या चोरीत या दोघांचा हात आहे काय तसेच विदेशी नागरिक गोव्यात येऊन हत्यारे आणून घरफोडी करू शकत नाही. त्यांना अन्य कुणाची सहकार्य आहे काय, त्यांनी गोव्यातील सीमकार्डचा वापर कसा काय केला, मुंबईतील चोरीत त्यांचा हात आहे काय, आदीची सखोल चौकशी सुरु आहे, असे देसाई यांनी सांगितले.

दोघे सराईत अट्टल गुन्हेगार

गोव्यात आल्यावर हे चोरटे नेमके कुठे राहिले. त्यांनी कुणाकुणाशी संपर्क साधला याची माहिती चोरटय़ांनी अद्याप दिलेली नाही. चारजणांपैकी दोघेजण सराईत अट्टल गुन्हेगार असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. या चोरटय़ांचा जोर्जीया देशातही चोरीप्रकरणात समावेश आहे काय याचीही पोलीस इन्टरपॉलद्वारे चौकशी करीत आहेत.

चौरीतील ऐवजाची म्हापशात विक्री

म्हापशात येऊन या चोरटय़ांनी चोरी करण्यासाठी वापरलेली साधने विक्री केल्याचे कबुली या चोरटय़ांनी दिली आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. त्यासाठी त्या चौघांकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी त्यांना म्हापसा बाजारपेठेत नेण्यात येणार आहे.

हणजूण पोलिसांना बक्षीस

दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी व बार्देश तालुक्याचे उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई यांनी हणजूण पोलीस स्थानकात जाऊन पोलीस निरीक्षक नवलेश देसाई व त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले. तसेच त्यांना रोख रकमेचे बक्षीसही जाहीर करून ते सर्वांना सुपूर्दही केले. तसेच त्यांना प्रशस्तीपत्रकेही देण्यात आली. इतक्या झटपट रोख रकमेचे बक्षीस व प्रशस्तीपत्रक देण्याची पोलीस खात्यातील ही पहिलीच वेळ आहे.

Related posts: