|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » धर्मपाल गुलाटी यांचा ‘पद्म’ने गौरव

धर्मपाल गुलाटी यांचा ‘पद्म’ने गौरव 

65 महनीयांना मिळाला पुरस्कार : राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी 65 कर्तबगार व्यक्तिमत्वांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे. एमडीएच मसाले कंपनीचे प्रमुख महाशय धर्मपाल गुलाटी, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचा यात समावेश आहे. गुलाटी यांना व्यापार आणि उद्योग-अन्नप्रक्रिया क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषणने गौरविण्यात आले आहे. यापूर्वी सोमवारी 47 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

फाळणीनंतर पाकिस्तानच्या सियालकोट येथून गुलाटी हे अमृतसरमध्ये स्थलांतरित झाले होते. पुढील काळात भाऊ आणि नातेवाईकांसोबत त्यांनी दिल्लीमध्ये व्यवसायास प्रारंभ केला. प्रारंभीच्या काळात रस्त्यावरील छोटय़ाशा दुकानात त्यांनी मसाल्यांची विक्री सुरू केली. 1959 मध्ये त्यांनी एमडीएच कारखान्याचा शुभारंभ केला. सध्या भारतात त्यांचे 15 कारखाने असून सुमारे 1000 वितरकांना त्यांच्या कंपनीकडून मसाल्यांचा पुरवठा होतो.

एमडीएचची दुबई आणि लंडनमध्ये देखील कार्यालये आहेत. ही कंपनी सुमारे 100 देशांना निर्यात करते. 5 वी पास या व्यक्तीने मागील आर्थिक वर्षात 21 कोटी रुपयांची वैयक्तिक कमाई केली आहे. एमडीएच नावाने प्रसिद्ध त्यांची कंपनी ‘महाशियां दी हट्टी’ला यंदा एकूण 213 कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. या कंपनीची 80 टक्के हिस्सेदारी गुलाटी यांच्याकडे आहे.

यंदा 112 जणांना पुरस्कार

यंदा एकूण 112 जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यांच्या नावाची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला झाली होती. पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्तींमध्ये अभिनेता मोहनलाल (पद्मभूषण), माजी विदेश सचिव एस. जयशंकर (पद्मश्री), क्रिकेटपटू गौतम गंभीर (पद्मश्री), अकाली दलाचे नेते सुखदेव ढिंढसा (पद्मभूषण), प्रसिद्ध वकील एच.एस. फुलका (पद्मश्री) यांचा समावेश आहे. पत्रकार कुलदीप नैयर (मरणोत्तर) यांनाही पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. याचबरोबर बिहारचे नेते हुकुमदेव नारायण यादव (पद्मभूषण), सिस्को सिस्टीमचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चेम्बर्स (पद्मभूषण) तसेच चित्रपट दिग्दर्शक प्रभूदेवा (पद्मश्री) यांना गौरविण्यात आले आहे.

Related posts: