|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काँग्रेसला बंडखोरीची भीती

काँग्रेसला बंडखोरीची भीती 

प्रतिनिधी/ बेंगळूर

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात निजद आणि काँग्रेसने युती केली आहे. दोन्ही पक्षांनी जागा वाटपाबाबत वाटाघाटी केल्या आहेत. मात्र, काँग्रेस पक्षात जागा वाटप आणि तिकिटाच्या मुद्यावरून निर्माण झालेला वाद उफाळून आला आहे. याच दरम्यान निजदला देण्यात आलेल्या काही मतदारसंघांमध्ये स्थानिक नेत्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. निजद काँग्रेसमध्ये जागा वाटप झाल्यानंतर उमेदवार निवडीचा पेच दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झाला आहे. काँग्रेसला तर उमेदवार निवड डोकेदुखी ठरत आहे. प्रामुख्याने बेळगाव, चिक्कमंगळूर, हावेरी, म्हैसूर, बागलकोट, दावणगेरे, कोप्पळ मतदारसघांमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.

कर्नाटकात भाजपला अधिक जागा मिळविण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसने निजदशी युती केली आहे. निजदला आवश्यकतेपेक्षा अधिक जागा सोडून देण्यात आले आहे. काँग्रेस खासदार असणारा तुमकूर मतदारसंघ निजदला दिल्यामुळे दक्षिण कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांमधील नाराजी उफाळून आली आहे. काँग्रेसचे खासदार मुद्दहनुमेगौडा यांना बंडखोर उमेदवार म्हणून निवडून आणण्याची धमकी काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूर मतदारसंघ निजदला देण्यास विरोध व्यक्त करून हायकमांड पातळीवर मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे म्हैसूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने स्वतःकडे राखण्यात यश मिळविले. परंतु तुमकूर मतदारसंघ म्हैसूरच्या मोबदल्यात निजदला द्यावा लागला आहे. परिणामी येथील काँग्रेस नेत्यांनी तुमकूरमधून मुद्दहनुमेगौडा यांनाच उमेदवारी द्यावी, अन्यथा बंडखोरी करू अशी भूमिका घेतली आह.

कारवार, उडुपी-चिक्कमंगळूर, विजापूर जिल्हय़ात निजदचा प्रभाव नसताना देखील हे मतदारसंघ त्या पक्षाला सोडून दिल्याने काँग्रेस गोटात असमाधानाचे वातावरण आहे.

मंगळूर, बेळगाव, धारवाड, हावेरी, दावणगेरे मतदारसंघांमध्ये प्रत्येक वेळेस पराभूत होणाऱयालाच पुन्हा तिकीट दिले जात आहे. नव्या चेहऱयांना संधी देण्यात येत नसल्याचा वरिष्ठांवर होत आहे. 

ए. मंजू यांच्याशी सिद्धरामय्यांची फोनवरून चर्चा

काँग्रेस नेते ए. मंजू यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरीचे शस्त्र उगारले आहे. कोणत्याहीक्षणी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. हासन लोकसभा मतदासंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी ए. मंजू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. बंडखोरी करण्याऐवजी पक्षनिष्ठा ठेवण्याचा सल्ला सिद्धरामय्यांनी त्यांना दिल्याचे समजते.

बागलकोटमध्येही पेच

बागलकोट माजी मंत्री एच. वाय. मेटी यांची मुलगी बायक्का मेटी, माजी आमदार विजयानंद काशप्पनवर यांची पत्नी वीणा काशप्पनवर यांच्यात तिकिटासाठी चढाओढ सुरू आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते अजकुमार सरनायक यांनी सध्या तटस्थ भूमिका घेतली आहे. एखाद्या वेळेस तिकीट न मिळाल्यास ते पक्षाविरुद्ध भूमिका घेण्याची शक्यता आहे. 

बेळगावचा तिढा आणखी जटील

खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांना बेळगावमधून लोकसभेचे तिकटी देण्याविषयी चर्चा सुरू असल्याने या भागातील काँग्रेस नेते विवेकराव पाटील, लक्ष्मी हेब्बाळकर, चेन्नराज, नागराज यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिकीट हुकल्यास विवेकराव पाटील बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

Related posts: