|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उमेदवार निवडीवरून भाजपमध्ये गोंधळ

उमेदवार निवडीवरून भाजपमध्ये गोंधळ 

लोकसभा निवडणुकीत 22 जागांवर विजय मिळविण्याचे उद्दिष्ट भाजपने  बाळगले आहे. परंतु, 7 मतदारसंघांमध्ये प्रबळ उमेदवार मिळत नसल्याने या पक्षातील नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. निजद-काँग्रेस युतीमधील गोंधळाचा लाभ उठविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला प्रतिस्पर्धी उमेदवारांविरुद्ध तगडा उमेदवार उभे करणे आव्हानात्मक ठरत आहे.

उमेदवार निवडीसंबंधी अंतिम निर्णय घेण्यासाठी रविवारी बेंगळूरच्या मल्लेश्वरम येथील प्रदेश भाजप कार्यालयात कार्यकरिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी 28 मतदारसंघातील उमेदवाराची अंतिम यादी तयार केली जाणार आहे. कर्नाटकात भाजपला मागील निवडणुकीत 17 जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी निजद आणि काँग्रेसने युती केल्यामुळे प्रबळ उमेदवारांची कमतरता भासत आहे. सात मतदारसंघांमध्ये विजयाची हमी असणारे उमेदवार नसल्याने भाजप वरिष्ठ नेत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कोणकोणते मतदारसंघ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची लाट राज्यात असली तरी त्याचा उपयोग करून घेण्यासाठी तगडा उमेदवार नसल्याने याचा लाभ युतीला होण्याची शक्यता आहे. बेंगळूर ग्रामीण, कोलार, रायचूर, चित्रदुर्ग, बळ्ळारी, चामराजनगर आणि हासन या मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवारांमधून अंतिमत: कोणाची निवड करावी, याबाबत भाजप नेत्यांमध्ये गेंधळ सुरू आहे.

राज्यातील 22 मतदारसंघांमध्ये विजय संपादन करण्याचे उद्दिष्ट भाजप हायकमांडने दिले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 7 मतदारसंघांत उमेदवार निवडीचा पेच जटील बनला आहे. त्यामुळे विजयाचे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल का? असा प्रश्न भाजप वर्तुळातूनच उपस्थित होत आहे.

भाजपचा बालेकिल्ला असणाऱया बळ्ळारी लोकसभा मतदारसंघांत मागील पोट निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता. रेड्डी बंधुंना निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्यात आल्याने या मतदारसंघांत भाजप कमकुवत ठरत आहे. प्रभावी भाजप नेते श्रीरामुलू यांना तिकीट देणार नसल्याचे वरिष्ठांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेते बी. नागेंद्र यांना ‘ऑपरेशन कमळ’च्या जाळय़ात अडकविणे शक्य झाले नाही. तर चित्रदुर्गमध्ये माजी खासदार जनार्दन स्वामी, मादार चेन्नय्या आणि मानप्पा वज्जल यांची नावे चर्चेत आहेत. परंतु चेन्नय्या आणि वज्जल यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. विद्यमान काँग्रेस खासदार बी. एन. चंद्रप्पा यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास जनार्दन स्वामी सक्षम नसल्याचे स्थानिक भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

बेंगळूर ग्रामीणमध्ये उमेदवार निवडीबाबत प्रश्न

बेंगळूर ग्रामीण मतदारसंघात निजद आणि काँग्रेसचा प्रभाव आहे. येथे मंत्री. डी. के. शिवकुमार यांचे बंधु खासदार डी. के. सुरेश यांच्या विरोधात कोणाला उभे करावे, असा प्रश्न भाजप समोर आहे. सी. पी. योगेश्वर यावेळी लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे येथील भाजप उमेदवार निवडीविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

निजदच्या बालेकिल्ल्यात अद्याप उमेदवार निवड नाही

हासन हा निजदचा बालेकिल्ला असून देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. पण येथे भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. काँग्रेस नेते ए. मंजू यांना भाजपात आणून तिकीट देण्यासाठी कसरत सुरू आहे. चामराजनगर या मतदारसंघात काँग्रेस वर्चस्व असून एम. शिवण्णा आणि व्ही. श्रीनिवास प्रसाद यांच्यापैकी कोणाला तिकीट द्यावे, याबाबत भाजपने निर्णय घेतलेला नाही. श्रीनिवास प्रसाद यांनी शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुराप्पा यांची भेट घेऊन चर्चा केल्याने त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

रायचूरमध्ये काँग्रेसचे विद्यमान खासदार व्ही. व्ही. नायक यांच्या विरोधात भाजपमधील तिघांची नावे चर्चेत आहेत. सण्णफकिरप्पा किंवा आमदार शिवनगौडा नायक यांची नावे चर्चेत आहेत. परंतु शिवनगौडा नायक यांच्या विरोधात ऑपरेशन कमळच्या ध्वनीफित प्रकरणी आरोप आहे. कोलारमध्येही भाजप उमेदवाराच्या शोध घेण्यासाठी धडपडत आहे. काँग्रेसमधील प्रभावी नेते एच. मुनीयप्पा यांचे वर्चस्व या मतदारसंघात आहे. ते 7 वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी भाजपमधील कोणीही पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे

Related posts: