|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » उद्योग » पुढील आर्थिक वर्षात सरकारी बँका येणार नफ्यात

पुढील आर्थिक वर्षात सरकारी बँका येणार नफ्यात 

इक्राचा अहवाल सादर : मार्च 2020 अखेरीस बुडीत कर्जांचे प्रमाण 3.5 ते 3.6 टक्क्यांवर घटेल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गेल्या चार वर्षात तोटय़ात असणाऱया सरकारी बँका येणाऱया आर्थिक वर्षाच्या अखेरीस नफ्यात येतील असे संकेत देण्यात येत आहेत. आर्थिक वर्ष 2019-20 च्या अखेरीस सरकारी बँकांना 23 ते 37 हजार कोटींचा निव्वळ नफा होईल अशी शक्यता, आयसीआरए (इक्रा) या आघाडीच्या पतमानांकन संस्थेने वर्तविली आहे. सरकारी बँकांच्या संभाव्य कामगिरीबाबतच्या विस्तृत अहवालात याबाबत इक्राने स्पष्टीकरण दिली आहे.

चार वर्षातील तोटय़ानंतर मार्च 2020 च्या अखेरीस सरकारी बँका किमान 23 हजार कोटी तर जास्तीत जास्त 37 हजार कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवतील. या बँकांच्या बुडीत कर्जांचे प्रमाणही कमी होईल, असा अंदाज या अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे. सरकारी बँकांच्या बुडीत कर्जांच्या प्रमाणाबाबतही या अहवालात दिलासाजनक अंदाज स्पष्ट करण्यात आला आहे. मार्च 2019 अखेरीस एकूण बुडीत कर्जांचे प्रमाण 10.9 तर निव्वळ बुडीत कर्जांचे प्रमाण 5.4 टक्के इतके असेल असा अंदाज देण्यात आला आहे. मात्र, बँकांची परिस्थिती सुधारण्याची शक्यता असून मार्च 2020 अखेरीस एकूण बुडीत कर्जांचे प्रमाण 8.1 ते 8.4 आणि निव्वळ बुडीत कर्जांचे प्रमाण 3.5 ते 3.6 टक्क्यांपर्यंत घटेल, असा अंदाजही या अहवालात नोंदवण्यात आला आहे. सरकारकडून 48 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवल पुरवठय़ाचाही फायदा बँकांना होत आहे.