|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » उद्योग » फोक्सवॅगनवर सेककडून अमेरिकेत खटला दाखल

फोक्सवॅगनवर सेककडून अमेरिकेत खटला दाखल 

वृत्तसंस्था/  वॉशिंग्टन

अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (सेक) फोक्सवॅगन या जर्मन कार उत्पादक कंपनीवर विषारी वायू उत्सर्जन घोटाळा प्रकरणी खटला दाखल केला आहे. फोक्सवॅगनने कारमधील वायू उत्सर्जनाच्या परिणामांविषयी गुंतवणूकदारांना अंधारात ठेवून अब्जावधी डॉलरचे कॉर्पोरेट बाँड विक्री केल्याचा आरोप सेकने केला आहे.

फोक्सवॅगनने एप्रिल 2014 ते मे 2015 या कालावधीत 13 अब्ज डॉलरचे कॉर्पोरेट बाँड विक्रीस आणले होते. त्याचवेळी अमेरिकेत रस्त्यांवर धावणाऱया सुमारे पाच लाख फोक्सवॅगनच्या कारमधून नियमापेक्षा अधिक प्रमाणात घातक वायुंचे उत्सर्जन होत असल्याची कल्पना कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांना होती. फोक्सवॅगनने हा उत्सर्जनाचा मुद्दा दडवून ठेवत लक्षावधी डॉलरची गुंतवणूक उभी केली, असा आरोप या खटल्यात करण्यात आला आहे. रोखे बाजारातून गुंतवणूक उभारण्याच्या इराद्याने कंपनीने गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारे अंधारात ठेवणे योग्य नाही, असे सेकचे सहसंचालक स्टेपॅनी अवेकियन यांनी स्पष्ट केले आहे.

फोक्सवॅगनचे माजी सीईओ मार्टिन विंटरकॉर्न यांना याप्रकरणी कंपनीत किंवा अन्य कोणत्याही कंपनीत पद भूषवण्यावर बंदी घालण्याची मागणीही सेकने केली आहे. पण याचदरम्यान, कंपनीने प्रत्येक कारमध्ये विषारी वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी डिफिट डिव्हायसेस बसवण्यात आली आहेत, असा दावा केला आहे.