|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » नागपुरात वंचित बहुजन आघाडीची जागा कोण लढवणार? घोषणेपूर्वीच MIM नेत्याचा उमेदवारी अर्ज

नागपुरात वंचित बहुजन आघाडीची जागा कोण लढवणार? घोषणेपूर्वीच MIM नेत्याचा उमेदवारी अर्ज 

ऑनलाईन टीम /  नागपूर : 

वंचित बहुजन आघाडीने अद्याप नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र त्याआधीच नागपुरातील एमआयएमचे माजी अध्यक्ष आणि स्थानिक नेते शकील पटेल यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीत नागपूरच्या उमेदवारीवरुन बिघाडी होते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपूरच्या अत्यंत महत्वपूर्ण जागेच्या उमेदवारीबद्दल भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेले असताना एमआयएमचे स्थानिक नेते शकील पटेल यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघात एमआयएमला संधी मिळाली पाहिजे अशी मागणी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विदर्भात पक्षाला किमान एक जागा मिळालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच आपल्या उमेदवारीला असदुद्दीन ओवैसी यांचा पाठिंबा असल्याचा दावाही शकील पटेल यांनी केला आहे.  दरम्यान, नागपूरच्या उमेदवाराबद्दल प्रकाश आंबेडकर लवकरच त्यांचा निर्णय जाहीर करतील. तोवर असे दावे अधिकृत नसल्याचे मत भारिप बहुजन महासंघाच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे नागपुरात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार भारिपचा असेल की एमआयएमचा, याबद्दल तर्कवितर्क सुरु झाले आहेत.