|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » …तर राधाकृष्ण विखे पाटलांना समज देऊ – अशोक चव्हाण

…तर राधाकृष्ण विखे पाटलांना समज देऊ – अशोक चव्हाण 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाचा छुपा प्रचार करत आहेत, मग तुमचे कार्यकर्ते कसा काँग्रेसचा प्रचार करतील, याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना चव्हाण म्हणाले, तसे काहीही नाही. राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचा प्रचार करतात. मात्र, तशी तक्रार असल्यास आम्ही पक्षाच्यावतीने त्यांना समज देऊ. मुलगा सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशामुळे विखे पाटील यांची चांगलीच गोची झाली आहे.

तुमचे विरोधी पक्षनेते भाजपा उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे फोटो फिरत आहेत. तर तुम्ही लोकांकडे कशी मते मागणार? असा प्रश्न चव्हाण यांना विचारण्यात आला होता. तर, मुलाच्या भाजपा प्रवेशानंतर, निवडणूक प्रचारात विरोधी पक्ष नेतेच जर त्यांच्या जिह्यात पक्षाचे काम करणार नसतील तर पक्षासाठी काम न करणाऱया कार्यकर्त्यांना कोणत्या तोंडाने जाब विचारायचा, असा प्रश्न काँग्रेसमधील काही नेत्यांना पडला आहे. त्यामुळे विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढत असल्याचेही बोलले जाते. याप्रकरणी, विरोधी पक्षनेते भाजपाचा प्रचार करत असतील, असे वाटत नाही. मात्र, तशा तक्रारी आल्यास त्यांना समज देऊ, असे म्हणत चव्हाण यांनी विखेंच्याबाबतीत सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, डॉ. सुजय विखे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही भेटायला गेले होते. त्यांच्याशी बोलून निघताना ‘तुम्ही काहीही निर्णय घ्या, पण मी उभे राहणारच आहे’ असे त्यांनाही ऐकवले होते. त्यामुळे पवारांचीही नाराजी त्यांनी ओढावून घेतली. विखे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन सुजय माझे ऐकत नाही, असे गाऱहाणे घातले होते. त्यावर राहुल गांधी यांनी सुजयशी फोनवर बोलणे केले होते. तुम्हाला नंतर योग्य संधी देऊ, आता तुम्ही पक्ष सोडू नका, असेही सांगितले होते. तरीही सुजय यांनी भाजपात प्रवेश केला.