|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पर्यटकांची कार जळून खाक

पर्यटकांची कार जळून खाक 

आंबोली घाटातील घटना : सहा पर्यटक सुखरुप

वार्ताहर / आंबोली:

गोव्याहून आंबोलीमार्गे मुंबईकडे जाणाऱया घाटकोपर-मुंबई येथील पर्यटकांची रेनॉल्ट कंपनीची कार आंबोली घाटात जळून खाक झाली. कारमधील सहा पर्यटक
प्रसंगावधान राखत कारमधून बाहेर उतरल्यानेच बचावले. कार पूर्ण जळून सुमारे नऊ लाखाचे नुकसान झाले. याबाबतची तक्रार कारचालक प्रफुल्लसिंग रणजितसिंग मोहिल (43, रा. मुंबई घाटकोपर) यांनी पोलिसांत दिली.

प्रफुल्लसिंग मोहिल हे आपल्या नातेवाईकांसह गोवा येथे कारने पर्यटनासाठी गेले होते. रविवारी ते आंबोलीमार्गे मुंबईला परतत असताना सकाळी 10.30 च्या सुमारास आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळील वळणावर त्यांच्या कारमधील इंजिनच्या भागाकडून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कार थांबविली. कारमधील सर्व सहाही पर्यटक पटकन खाली उतरले. त्यानंतर क्षणार्धात कारने पेट घेतला. घाटातील धबधबे प्रवाही नसल्याने आग विझविण्यासाठी पाणी मिळाले नाही. त्यामुळे कार पूर्ण जळून खाक झाली. या घटनेची खबर आंबोली पोलीस दूरक्षेत्रात देण्यात आली. पोलीस नाईक राजेश गवस यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.