|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावचा पारा 36.3 अंशावर, उष्म्यात वाढ

बेळगावचा पारा 36.3 अंशावर, उष्म्यात वाढ 

प्रतिनिधी/ बेळगाव

गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱया बेळगावात सध्या उष्णतेने काहूर माजविला आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यात सर्वसामान्य जनता हैराण होऊ लागली आहे. श्रीमंती थाट न परवडणाऱया सर्वसामान्यांच्या अंगाची काहिली होऊ लागली असून सध्या उष्णतेचा पारा 36.3 अंशांपर्यंत चढला आहे. मार्चच्या मध्यावधीत निर्माण झालेली ही परिस्थिती चिंताजनक असून उन्हाचा तडाखा असाच वाढत गेल्यास आजारांची तीव्रता आणि पाण्याचे दुर्भिक्ष मोठय़ा प्रमाणात वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत बेळगाव शहराचे तापमान समतोल होते. किमान 16 तर कमाल 32 अंश सेल्शीयसपर्यंतच्या तापमानाची नोंद आढळत होती. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातही तापमानात तितकी वाढ नव्हती. यामुळे या महिन्यात उष्म्याचा तडाखा वाढला नव्हता. दिवसा ऊन असले तरी रात्रीच्या वेळी गारठा पसरत होता. यामुळे नागरिक निवांत झोप घेऊ शकत होते. मात्र, एकेक अंश सेल्शीयसने हा पारा वाढत गेल्यानंतर दिवसा आणि रात्रीही उकाडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सर्वसाधारणपणे 15 मार्चनंतर या उकाडय़ात वाढ होऊ लागली आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्शीयसपासून वाढत गेल्यानंतर उन्हाच्या झळा मोठय़ा प्रमाणात बसू लागल्या आहेत. 10 मार्चनंतर कमाल तापमान 35 अंश सेल्शीयसपर्यंत जाऊन ते कायम राहिल्यामुळे उकाडय़ाची तीव्रता न सोसणारीच ठरू लागली आहे. रात्रीच्या वेळी वाढत्या उष्म्यात डासांचे प्रमाण मोठे आहे. हे डास आणि उष्णता यातून सुटका करून घेण्यासाठी शहरी भागात फॅनची गरज भासू लागली आहे. 

ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी दीड ते दोनपर्यंत जागरण करून वाढत्या उष्म्याचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दिवसा तर उन्हाच्या वाढत जाणाऱया झळा जनजीवनच विस्कळीत करू लागल्या असून याचा बाजारपेठेवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. दुपारनंतर तर बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरू लागला असून सूर्य मावळेपर्यंत बाहेर पडण्याचे धाडस नागरिक करेनासे झाले आहेत. महिलावर्गाकडून भर उन्हात छत्र्या वापरण्याचे प्रमाण वाढले असून उन्हात पायपीट करण्याचे दिव्य पार पाडताना अनेक जण शीतपेयांचा आधार घेऊ लागले आहेत.

दरवर्षी होळीच्या तोंडावर उन्हाच्या झळा मोठय़ा प्रमाणात वाढतात. होळी दिवशी किंवा त्यानंतर वळीवाच्या पावसाचा मारा होऊन वातावरण थंडावते, असा जुन्या जाणत्यांचा अनुभव आहे. यंदा वळीवाने मारा करून उन्हाची तीव्रता कमी करावी, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. अन्यथा, सर्वत्र उन्हात होरपळण्याचाच प्रकार सुरू झाला आहे. बेळगावचा पारा सध्या 36.3 कमाल तापमान तर किमान तापमान 23 अंशावर येवून पोहोचले आहे. त्यामुळे यावेळीची उष्णता अनेकांना नको म्हणण्याची वेळ आली आहे. येत्या काळात जर अशीच परिस्थिती राहिली तर दुष्काळाच्या झळा तीव्र होणार आहेत.

एकीकडे पाण्याचे स्रोत आटू लागल्याने आतापासूनच पाणीटंचाई भासू लागली आहे. उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास पाण्याच्या भीषण दुर्भिक्षाला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन उद्भवणाऱया आजारांचेही प्रमाण वाढत आहे. उष्णतेच्या विकारांमुळे रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. सूर्याच्या या तीव्रतेला आता आवर घालण्यासाठी वरुणराजाने कृपा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.