|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हेस्कॉमचा अचानक भारनियमनाचा शॉक

हेस्कॉमचा अचानक भारनियमनाचा शॉक 

प्रतिनिधी/ निपाणी

शहर व ग्रामीण भागातील बहुतांशी व्यावसायिक व ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता रविवारी अचानक भारनियमन करून हेस्कॉमने झटका दिल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हेस्कॉमच्या या प्रकाराने तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावेळी दुरुस्ती काम हाती घेतल्याचे कारण सांगण्यात आले असले तरी याची पूर्वकल्पना देणे आवश्यक होते. असे मत व्यक्त होत आहे.

रविवार सुटीचा दिवस असल्याने विद्यार्थी तसेच नोकरदार वर्ग घरी होते. मात्र अचानक भारनियमनातून बत्ती गुल झाल्याने त्यांची तारांबळ उडाली. येथील श्रीपेवाडीतील औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने नुकतेच मंदीतून सावरत असताना रविवारी कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या भारनियमनाने कारखानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच कामगारांना विजेअभावी सुटी देणे भाग पडले. उन्हाळी हंगाम असल्याने अचानक भारनियमनाने आईस्क्रिम कारखानदार तसेच शीतपेये उत्पादकांनाही फटका बसला.

शहरातील काही नागरिकांना मोबाईलवर संदेश पाठवून भारनियमन होणार असल्याचे कल्पना देण्यात आली होती. मात्र हे संदेश भारनियमन झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहचले. सकाळी 8 वाजताच वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. वीजपुरवठय़ावर चालणारे बहुतांशी व्यवसाय बंद राहिले. तसेच तीव्र उष्णतेमुळे घरी असूनही अनेकांना उकाडय़ाचा त्रास सहन करावा लागला. अखेर दुपारी तीननंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. हेस्कॉमने अचानक अशाप्रकारे यापूर्वीही वीजपुरवठा खंडित केल्याचे प्रकार घडले आहेत. निदान यापुढे तरी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी होत आहे.