|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » इनरव्हील क्लबतर्फे ‘वामा’ महिलादिन साजरा

इनरव्हील क्लबतर्फे ‘वामा’ महिलादिन साजरा 

प्रतिनिधी/ बेळगाव

विविध मैदानी खेळ, अभिरुप पत्रकार परिषद, उत्साहाने सळसळणारा फॅशन शो अशा विविध कार्यक्रमाने इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे ‘वामा’ हा महिला दिन शनिवारी पार पडला. जैन हेरिटेजच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून कॅन्टोन्मेंटच्या सीईओ दिव्या शिवराम उपस्थित होत्या.

इनरव्हील क्लबतर्फे सकाळी आरपीडीच्या मैदानावर लगोरी आणि अडथळय़ांची शर्यत यासह विविध खेळ पार पडले. याचे संचलन किर्ती टेंबे यांनी केले. सायंकाळी जैन शाळेच्या सभागृहात अभिरुप पत्रकार परिषद व फॅशन शो पार पडला. अभिरुप पत्रकार परिषदेचे संचलन संध्या शेरेगार व पुष्पा देशपांडे यांनी केले. तर साडी या थीमवर झालेल्या फॅशन शोचे संचलन ममता जैन यांनी केले.

मैदानी खेळाच्या स्पर्धेत 125 महिलांनी भाग घेतला. दामिनी या फॅशन शोमध्ये 35 महिलांनी व यामिनी या अभिरुप पत्रकार परिषदेत दहा महिलांनी भाग घेतला. सर्व विजेत्यांना दिव्या शिवराम यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

यावेळी त्या म्हणाल्या, माझ्या आयुष्यातील सुंदर दिवसांची पुनरुक्ती होणार असेल तर ती पुन्हा बेळगावमधील माझी कारकीर्द असलेले दिवस मागून घेईन. इतके बेळगाव मला आवडले आहे. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वासंती आचार्य यांनी आराधना या गतिमंद मुलांच्या शाळेला दत्तक घेतले आहे. ही शाळा कॅन्टोन्मेंट परिसरात असल्याने इनरव्हील क्लबने मला उत्तम कार्याची संधी दिली आहे, असे त्या म्हणाल्या.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा वासंती आचार्य, सचिव मेधा शाह, आसावरी संत, संध्या शेरेगार व किर्ती टेंबे उपस्थित होत्या.

वासंती आचार्य यांनी त्यांचा सत्कार केला. पुष्पा देशपांडे यांनी परिचय करून दिला. सोनल धामणकर यांनी स्पर्धकांना विविध प्रश्न विचारले. वामाच्या इव्हेंट चेअरमन डॉ. आसावरी संत यांनी प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले. सूत्रसंचालन बेला शिवलकर व उर्मी शेलेगार यांनी केले.  

 पुरस्कार वितरण

याचवेळी रोटे. कै. भाऊ नाईक पुरस्कृत मधुवंती नाईक पुरस्कार हेमलता कुंदरी यांना नर्सिंग सेवेबद्दल देण्यात आला. भाऊ नाईक यांच्या कन्या साधना गणाचारी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.