|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » हिंदू मुलींच्या अपहरणावरुन सुषमा स्वराज आणि पाकमंत्र्यामध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध

हिंदू मुलींच्या अपहरणावरुन सुषमा स्वराज आणि पाकमंत्र्यामध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध 

ऑनलाईन टीम /  इस्लामाबाद :

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून होळीच्या पूर्वसंध्येला दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करण्यात आले. या मुलींना जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी दबाव आणण्यात आल्याची बातमी आहे. यावरुन भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले. सुषमा स्वराज यांनी या घटनेचा हवाला देत पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना या घटनेबाबत अहवाल पाठविण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र सुषमा स्वराज यांच्या ट्विटवर उत्तर देताना पाकिस्तानचे प्रसारण मंत्री फवाद चौधरी हे म्हणाले की, ही घटना पाकिस्तानमधील अंतर्गत विषय आहे आणि येथील लोकांना विश्वास आहे की, हा मोदींचा भारत नाही ज्याठिकाणी अल्पसंख्याकांवर दबाव आणला जातो. हा इमरान खान यांचा नवीन पाकिस्तान आहे. आमच्या झेंड्याचा पांढरा रंग आम्ही सर्वांशी समान न्यायाने वागतो हे दर्शवतो. मला खात्री आहे की, ज्यावेळी भारतीय अल्पसंख्याकांच्या अधिकारावर गदा येईल तेव्हा तुम्ही याच तत्परतेने कारवाई कराल असे म्हटले. तर फवाद चौधरी यांच्या ट्विटला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या, आपल्या भितीमागे हा पर्याय असू शकतो, मात्र आपल्या बोलण्यातून हे दिसते  की आपण गुन्हेगारीच्या भावनेतून बोलत आहात. ही घटना पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यामध्ये घडली आहे. होळी सणाच्या एक दिवस आधी काही अज्ञात लोकांनी दोन हिंदूअल्पवयीन मुलींचे अपहरण केले. अपहरण केल्यानंतर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये या दोन्ही मुलींचा जबरदस्तीने एक मौलाना निकाह लावून देताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये या अल्पवयीन मुलींनी स्वखुशीने इस्लाम धर्म कबूल केल्याचे  सांगण्यात आले. माहितीनुसार पाकिस्तानमधील हिंदू समुदायाने या घटनेच्या विरोध करत निर्दशने केली आहेत. संबंधित दोषींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.