|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ग्रीसच्या तुरुंगातून पाच भारतीयांची सुटका

ग्रीसच्या तुरुंगातून पाच भारतीयांची सुटका 

वार्ताहर/ निपाणी

ग्रीस येथील ऍड्रॉमेडा शिपींग कंपनीत काम करणाऱया बुदिहाळ येथील सतीश विश्वनाथ पाटील या अभियंत्यासह पाच भारतीय अभियंत्यांना ग्रीस येथील नेव्ही प्रशासनाने 14 महिन्यापूर्वी म्हणजेच 12 जानेवारी 2018 रोजी तुरुंगात डांबले होते. जहाजामध्ये स्फोटक वस्तू ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. यासाठी करण्यात आलेल्या यशस्वी पाठपुराव्यानंतर तेथील न्यायालयाने संबंधित पाचही अभियंत्यांना निर्दोष ठरवून नुकतीच सुटका केली. यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

तुरुंगात डांबण्यात आलेल्या अभियंत्यांमध्ये बुदिहाळच्या सतीश पाटीलसह जयदीप ठाकूर-पंजाब, भूपेंद्र सिंह-पंजाब, गगनदीपकुमार-बेंगळूर, रोहतेशकुमार-झारखंड यांचा समावेश होता. सुटका झालेल्या पाचही अभियंत्यांना मुंबई येथे आणण्यात आले असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना आपापल्या गावी पाठविण्यात येणार आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मालवाहू जहाज घेऊन सदरचे अभियंते तुर्की देशातून इजिप्त या देशाकडे जात होते. इजिप्तकडे जात असताना जहाजामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. यासाठी दुरुस्तीसाठी जहाज नजीकच्या ग्रीस बंदरावर नेण्यात आले. दुरुस्तीचे काम पूर्ण करून जहाज पुन्हा इजिप्तच्या दिशेने जात असतानाच तुर्कीच्या नौदलाने सदर जहाजावर हद्द तोडल्याचा आरोप करताना कारवाई केली. या जहाजामध्ये 14 कंटेनरमध्ये संशयास्पद वस्तू असल्याचा ठपका तुर्कीच्या नौदलाने ठेवला व जहाजावरील पाचही अभियंत्यांना ताब्यात घेतले.

पाचही अभियंत्यांवर कारवाई करताना ग्रीसमधील कोर्याडॅल्लोस तुरुंगात डांबले. यानंतर न्यायालयातील प्रक्रिया सुरू झाली. तब्बल 14 महिन्यांच्या कालावधीनंतर जहाजामध्ये असणारे स्फोटक पदार्थ हे फटाके बनविण्याची कच्ची सामुग्री असल्याचे सिद्ध झाले. यामुळे या अभियंत्यांची न्यायालयाने निर्देष मुक्तता केली. हे अभियंते विमानाने रविवारी मुंबईत दाखल झाले. या अभियंत्यांचे देशातील सर्वात जुनी आणि अग्रगण्य संघटना मेरिटाइम युनियन ऑफ इंडिया या संघटनेने जल्लोषी स्वागत केले. या अभियंत्यावर आता वैद्यकीय व मानसिक उपचार होणार असून यानंतर त्यांना आपापल्या घरी पोहचविण्यात येणार आहे.

निर्दोषत्व सिद्ध

आपला मुलगा जहाजवर अभियंता म्हणून रुजू झाला. याबाबत आनंद वाटत असतानाच त्याला जहाजामध्ये स्फोटके सापडल्याचे कारण ठेवून तुरुंगात डांबण्यात आले. यावेळेपासून आपल्याला काहीच सुचत नव्हते. आपला मुलगा निर्दोष असल्याची खात्री होती. पण परदेशात ते सिद्ध होणे गरजेचे होते. त्याचे हे निर्दोषत्त्व आता सिद्ध झाले असून तो 14 महिन्यानंतर घरी परतणार आहे. याचा  आनंद होत आहे असे वडील विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.

एकही दिवस झोप नाही!

आपल्या एकुलत्या एक असणाऱया पोटच्या गोळय़ाला चुकीच्या माहितीतून तुरुंगात रहावे लागले. 14 महिने त्याने तुरुंगवास भोगला. या काळात एकही दिवस आपल्याला झोप लागली नाही की अन्न गोड लागले नाही. आता मुलाचे निर्दोषत्व सिद्ध झाले असून तो घरी येणार असल्याचा आनंद शब्दात सांगणे शक्य नाही, असे सतीशची आई राजश्री पाटील यांनी सांगितले.