|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » मोदी, शहा भाजपाच्या उत्तर प्रदेशमधील स्टार प्रचारकांच्या यादीत; अडवाणी, मुरली मनोहर जोशींना वगळले

मोदी, शहा भाजपाच्या उत्तर प्रदेशमधील स्टार प्रचारकांच्या यादीत; अडवाणी, मुरली मनोहर जोशींना वगळले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सपा आणि बसपामध्ये झालेल्या महाआघाडीमुळे उत्तर प्रदेशात भाजपासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात यश मिळवण्यासाठी भाजपाने सर्वस्व पणाला लावले आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज आपल्या उत्तर प्रदेशातील स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा समावेश आहे. 

सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशसाठी भाजपाने एकूण 40 स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, उमा भारती यांचा समावेश आहे. मात्र ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केलेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण 80 जागा असून, 2014 च्या निवडणुकीत भाजपाने तिथे बंपर यश मिळवताना 70 हून अधिक जागांवर कब्जा केला होता. मात्र यावेळी सपा-बसपाने निवडणूकपूर्व आघाडी केल्याने भाजपासमोर आव्हान निर्माण झालेले आहे.