|Monday, June 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » उमेदवारीचे ‘चंद्र’ग्रहण सुटले आता टक्कर मातब्बरांशी

उमेदवारीचे ‘चंद्र’ग्रहण सुटले आता टक्कर मातब्बरांशी 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून विनायक राऊत, स्वाभिमान पक्षाकडून नीलेश राणे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडून नवीनचंद्र बांदिवडेकर या तिघांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे.

जागा वाटपाच्या घोळावरून हैराण झालेल्या काँग्रेसने रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केलेल्या नवीन‘चंद्रा’ला सनातन संस्थेशी असलेल्या संबंधाचे लागलेले ग्रहण अखेर सुटले. सनातन संस्थेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करीत काँग्रेसने नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. मात्र, त्यांच्यासमोर सेना-भाजप युती आणि स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांवर मात करण्याचे मोठे आव्हान आहे. जागा वाटपाचा घोळ अजूनही संपलेला नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातही थोडा घोळ निर्माण झाला होता. काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी जाहीर होताच सनातन संस्थेशी त्यांचे संबंध जोडले गेले होते. त्यामुळे नव्यानेच निवडणूक रिंगणात उतरणाऱया नवीन‘चंद्रा’ला निवडणुकीपूर्वीच ग्रहण लागले होते. नालासोपारा येथून वैभव राऊत या तरुणाला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती. त्याच्या घरातून 20 देशी बाँब व 2 जिलेटीन जप्त करण्यात आले होते आणि तो सनातन संस्थेचा समर्थक आहे. तरीही राऊतच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी केले होते, असा मुद्दा पुढे आणत बांदिवडेकर यांची उमेदवारीच अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, राऊत हा भंडारी समाजाचा होता आणि आपण भंडारी समाजाचे नेतृत्व करीत असल्याने एक समाजबांधव म्हणून त्यांच्याशी संबंध आला होता. सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर काँग्रेसनेही क्लीन चिट देत बांदिवडेकर यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आणि अखेर काँग्रेसच्या नवीन‘चंद्रा’स सनातन संबंधाचे लागलेले ग्रहण सुटले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी जाहीरपणे शिवसेनेला भंडारी समाजाचा पाठिंबा दिला आणि खासदार विनायक राऊत यांना निवडून आणण्यासाठी ताकद लावली. आता काँग्रेसकडे मातब्बर उमेदवार नसल्याने काँग्रेसने बांदिवडेकर यांना हेरले आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून  त्यांना उमेदवारी जाहीर केली.  बांदिवडेकर यांच्यासमोर युतीतील शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसकडून लढलेले आणि आता स्वाभिमान पक्षाकडून उमेदवारी मिळालेले नीलेश राणे असे मातब्बर उमेदवार आहेत. त्यामुळे सनातन संबंधाचे लागलेले ग्रहण जसे सोडविले, तसे निवडणुकीचेही ग्रहण सोडवून विजयी होण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत 4 लाख 93 हजार 88 मते मिळवून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांना सेना-भाजप युती बरोबरच भंडारी समाजाच्या पाठिंब्यानेही मिळालेली मते आता बांदिवडेकर यांना आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. काँग्रेसकडून निवडणूक लढलेले नीलेश राणे यांना 3 लाख 43 हजार 37 मते मिळाली होती. आता हेच नीलेश राणे स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे राणेंना त्यावेळी मिळालेली सर्व मते काँग्रेसला मिळणार नाहीत. मूळ काँग्रेसची मते काँग्रेस उमेदवार म्हणून बांदिवडेकर यांना मिळतील आणि राणे समर्थकांची मते स्वाभिमान पक्षाला मिळतील. मात्र कुठल्याच पक्षाला बांधून न घेणाऱया मतदारांची मते मिळविण्यासाठी या दोघांना प्रयत्न करावे लागतील.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून विनायक राऊत, स्वाभिमान पक्षाकडून नीलेश राणे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडून नवीनचंद्र बांदिवडेकर या तिघांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या निवडणुकीतील मतांचे गणित मांडले, तर राऊत हे सर्वात प्लसमध्ये आहेत. कारण ते गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही युतीकडूनच निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे त्यांची मते विभागली जाणार नाहीत हे कागदावरचे गणित असले, तरी पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. युतीमधला भाजप मित्रपक्षच नाराज आहे, भंडारी समाजाचा पाठिंबा देणारे नेतेच काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे खासदार राऊत यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही.

नीलेश राणे काँग्रेस आघाडीकडून लढले होते. त्यामुळे राणे समर्थकांसह काँग्रेस व राष्ट्रवादीची मते मिळाली होती. परंतु आता ते स्वतंत्रपणे स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवित असल्याने राणे समर्थकांचीच मते पडतील मात्र शिवसेनेवर नाराज असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्याचा ते किती फायदा करून घेणार हे पहावे लागेल. त्यामुळे त्यांनाही ही निवडणूक सोपी नाही. नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा नवा चेहरा आहे. त्यामुळे आपल्या विरोधातील राजकारणातील अनुभवी चेहऱयांना टक्कर द्यावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीची मते इकडे-तिकडे जाऊ न देता एक गठ्ठा मते मिळवावी लागतील. भंडारी समाजाचे नेतृत्व करीत असल्याने भंडारी समाजाची मते मिळवावी लागतील. शिवाय मच्छीमार बांधव सत्ताधाऱयांवर नाराज आहेत. त्याचाही फायदा घ्यावा लागेल, तरच उमेदवारीचे चंद्रग्रहण जसे सोडविले, तसे मातब्बर उमेदवारांवर मात करण्याचे ग्रहणही सोडवावे लागेल अन्यथा त्यांनाही ही निवडणूक जड जाऊ शकते.

संदीप गावडे