|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोंडय़े गावात घराजवळ वीज कोसळली

कोंडय़े गावात घराजवळ वीज कोसळली 

वार्ताहर/ संगमेश्वर

शनिवारी सोसाटय़ाच्या वाऱयासह संगमेश्वर तालुक्यात गारांचा पाऊस पडल्याने शेतकरी व बागायतदारांची धावपळ उडाली. संगमेश्वर खाडीभागातील कोंडय़े गुरववाडी येथे संदीप मुंडेकर यांच्या राहत्या घराजवळ वीज पडून नुकसान झाले आहे. यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला, परंतु कोणतीही इजा झालेली नाही. मात्र वीज घरानजीकच्या भेल्याच्या झाडावर कोसळल्याने झाड मधोमध चिरले गेले.

शनिवारी दुपारनंतर गारांच्या पावसामुळे व वादळी वाऱयामुळे काजू, आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. विजेच्या कडकडाटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी कोंडय़े-गुरववाडी येथील संदीप मुंडेकर यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठय़ाजवळ असलेल्या भेल्यावर वीज कोसळली. त्यामुळे भेल्याचे झाड मध्यभागी चिरले गेले. यावेळी गुरांच्या गोठय़ात 2 बैल बांधलेले होते, परंतु त्यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र संदीप मुंडेकर यांना वीज पडली तेव्हा विजेचा सौम्य धक्का बसला. मात्र यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.

रविवारीही ढगाळ वातावरण

दरम्यान संगमेश्वर तालुक्यात रविवारीही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी कडक ऊन व सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाचे थेंब पडले. तर शनिवारी पडलेल्या पावसामुळे आंबा गळू लागला आहे. तर काही ठिकाणी फळाला काळे डाग पडू लागले आहेत. 

वादळी वाऱयामुळे आंबा बागायतदार चिंतेत

शनिवारी रत्नागिरी जिल्हय़ात झालेल्या वादळी पावसामुळे आंबा बागायतदार चिंतेत सापडला आहे. काही ठिकाणी फळ तोडणीच्या कामाला सुरूवात झाली होती. मात्र या अवकाळी पावसामुळे यामध्ये खंड पडला आहे. आंबा वाचवण्यासाठी पुन्हा फवारणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून त्यामुळे बागायतदारांच्या खर्चात अधिक भर पडण्याची शक्यता आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे यांनी व्यक्त केली आहे.