|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गोरखपूरमधून रवि किशन

गोरखपूरमधून रवि किशन 

भाजपची नवी यादी जाहीर : आमदाराला चप्पलेने बडवणाऱया खासदाराचे तिकीट कापले

वृत्तसंस्था/  लखनौ 

उत्तरप्रदेशातील 7 लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार भाजपने सोमवारी जाहीर केले आहेत. संतकबीरनगर जिल्हय़ातील आमदाराला चप्पलेने मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आलेले खासदार शरद त्रिपाठी यांचे तिकीट कापून प्रवीण निषाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. योगी आदित्यनाथांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये भाजपने प्रसिद्ध अभिनेते रवि किशन यांना संधी दिली आहे.

गोरखपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळविला होता. प्रवीण निषाद यांनी गोरखपूर मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकली होती, पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निषाद यांनी भाजपमध्ये प्रवेश करत विरोधी आघाडीला धक्का दिला होता. रविकिशन हे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील दिग्गज असून त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ उचलण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. रवि किशन हे मूळचे जौनपूर जिल्हय़ातील असून पूर्वांचलमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

त्रिपाठींच्या वडिलांना संधी

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या 21 व्या यादीत प्रतापगढमधून संगमलाल गुप्ता यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 2014 च्या निवडणुकीत प्रतापगढ लोकसभा मतदारसंघात अपना दलाचे कुंवर हरिवंश सिंग यांनी विजय मिळविला होता. अपना दल-भाजप आघाडीमुळे हा मतदारसंघ रालोआच्या वाटय़ाला गेला होता. तर भाजपने संतकबीरनगरचे विद्यमान खासदार शरद त्रिपाठी यांना उमेदवारी नाकारली असली तरीही त्यांचे वडिल आणि उत्तरप्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष रमापति राम त्रिपाठी यांना देवरिया मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे.

आंबेडकरनगरमध्ये बिहारींना तिकीट

भाजपने आंबेडकरनगर लोकसभा मतदारसंघात मुकुट बिहारी यांना उमेदवारी दिली आहे. मुकुटबिहारी हे उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणून कार्यरत आहेत. भाजपने जौनपूर मतदारसंघाकरता के.पी. सिंग तर भदोहीमध्ये रमेश बिंद यांना उमेदवारी घोषित केली आहे.