|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गात तीन ‘सखी’ मतदान केंद्रे

सिंधुदुर्गात तीन ‘सखी’ मतदान केंद्रे 

महिला मतदारांसाठी निवडणूक आयोगाची विशेष संकल्पना

कणकवली, कुडाळ व सावंतवाडीत प्रत्येकी एका केंद्राचा समावेश

केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीसही महिलाच असणार

दिगंबर वालावलकर / कणकवली:

लोकशाहीचा महत्वाचा टप्पा असलेल्या मतदान प्रक्रियेत नवनवीन बदल होत असतात. मतदान प्रक्रिया अजून गतिमान व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपाययोजना करण्यात येतात. या लोकसभा निवडणूकीतही अशाच प्रकारे महिलांसाठी स्वतंत्र ‘सखी मतदान केंद्रे’ स्थापन करण्यात येणार आहेत. विधानसभा क्षेत्रनिहाय महिला मतदारांची संख्या जास्त आहे, अशा निवडक मतदान केंद्रांवर ही संकल्पना राबविली जाणार आहे. जिल्हय़ात अशा तीन मतदान केंद्रांची निवड करण्यात आली आहे. यात कुडाळ, कणकवली व सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येकी एका मतदान केंद्राची निवड केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

इंटरनेटमुळे जग जवळ आले, त्याच पद्धतीने निवडणूक पद्धतीतही झपाटय़ाने बदल होऊ लागले. निवडणुकीसाठी सुरुवातीला वापरण्यात येत असलेल्या बॅलेट पेपर ऐवजी ‘ईव्हीएम’चा वापर होऊ लागला. नंतर आता या निवडणुकीत सर्वत्रच ‘व्हीव्हीपॅट’ मशीनचा वापर करण्यात येणार आहे. मतदानाची पद्धत काळानुरूप बदलू लागली, तशीच मतदारांना मतदानासाठी आकर्षित करणे व मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता ‘सखी’ मतदान केंद्राची नव्याने भर पडणार आहे.

‘त्या’ केंद्रावर असणार ‘महिला राज’

महिलांचा मतदानाचा सहभाग अजून वाढविण्याच्यादृष्टीने ही संकल्पना या निवडणुकीत राबविण्यात येणार आहे. या मतदान केंद्रात मतदान केंद्राध्यक्षापासून ते सहाय्यक केंद्राध्यक्ष व अन्य सर्व निवडणूक कर्मचारीही महिलाच असणार आहेत. सखी मतदान केंद्रावर ईव्हीएम व अन्य सुरक्षिततेच्या अनुषंगाने कार्यरत असणारे पोलीस कर्मचारीही महिलाच असल्याने, या ‘सखी’ मतदान केंद्रावर संपूर्ण ‘महिला राज’ असणार आहे. त्यामुळे हे केंद्र कसे असणार, त्या केंद्रावरील सर्वच महिला कर्मचाऱयांकडून कसे कामकाज हाताळले जाणार, त्याची उत्सूकता आहे. त्या केंद्रामुळे महिला मतदारांचा मतदानाचा टक्का ही वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

जिल्हय़ात अशी आहे महिला मतदारांची संख्या

जिल्हय़ात महिला मतदारांची संख्या मोठी आहे. यात कणकवली विधानसभेत 1 लाख 16 हजार 867, कुडाळ-मालवण मतदारसंघात 1 लाख 7 हजार 509 व सावंतवाडी मतदारसंघात 1 लाख 10 हजार 496 महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कणकवली विधानसभेत सर्वाधिक महिला मतदार आहेत.

जिल्हय़ात तीन ‘सखी मतदान केंद्रे’ 

जिल्हय़ात कणकवली विधानसभा क्षेत्रात केंद्र क्रमांक 301-कलमठ, कुडाळ विधानसभेत 215-कविलकाटे व सावंतवाडी मतदारसंघात 142-सावंतवाडी शहर या तीन केंद्रांवर ‘सखी मतदान केंद्र’ तयार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यात कलमठ केंद्रावर 732, कविलकाटेत 523 व सावंतवाडी शहरातील केंद्रावर 294 महिला मतदार मतदानाचा अधिकार या ‘सखी’ मतदान केंद्रावर बजावणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

विधानसभा मतदारसंघनिहाय महिला मतदार संख्या

कणकवली विधानसभा-1 लाख 16 हजार 867

कुडाळ-मालवण विधानसभा-1 लाख 7 हजार 509

सावंतवाडी विधानसभा-1 लाख 10 हजार 496

‘सखी’ मतदान केंद्रावरील महिला मतदार संख्या

कलमठ-732

कविलकाटे-523

सावंतवाडी-294