|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एसटी महामंडळ रोज 2.64 कोटीने तोटय़ात

एसटी महामंडळ रोज 2.64 कोटीने तोटय़ात 

2018-19 चा तोटा 965 कोटींचा एसटी फायद्यात येण्याची चिन्हे नाहीत

संचित तोटाही 4600 कोटींहून अधिक

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला लागलेले तोटय़ाचे ग्रहण याहीवर्षी संपलेले नाही. वाढती अवैध वाहतूक, कंत्राटी तत्वावरील गाडय़ा, नवीन गाडय़ांची खरेदी नसणे, शासनाकडून देय रक्कम वेळेत न मिळणे यामुळे दरवर्षी हा तोटा वाढत आहे.

एसटी महामंडळाला 2018-19 या वर्षात तब्बल 965 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. म्हणजेच महामंडळ रोज 2.64 कोटीने तोटय़ात चालते. शासन आणि महामंडळस्तरावर कितीही नवनवीन कल्पना व योजना आणल्या, तरीही तोटय़ात चाललेले महामंडळ नफ्यात येण्याची चिन्हे दिसत नाही. दुसरीकडे महामंडळाचा संचित तोटा 4634 कोटींवर जाऊन पोहोचला आहे. महामंडळाची ही वाटचाल अशीच राहिल्यास एसटी महामंडळ होते, असे म्हणण्याची वेळ येणार आहे.

अंदाजाच्या तिप्पट तोटा

एसटी महामंडळाला 2017-18 या वर्षात महामंडळाला 1028 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर पूर्वकालीन समायोजनाचा विचार केल्यास हा निव्वळ तोटा 1338.62 कोटींवर गेला होता. त्यामुळे महामंडळाच्या संचित तोटय़ात वाढ होत असून 2018-19 मध्येही महामंडळाला सुमारे 350 कोटींहून अधिक तोटा होण्याचा अर्थसंकल्पीय व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात त्याच्या तिप्पट तोटा झाल्याचे दिसून येत आहे.

तोटय़ाला धोरणच जबाबदार?

रा. प. महामंडळाच्या तोटय़ाला तसे कुठचे एकमेव कारण जबाबदार आहे, असे मुळीच नाही. वाढती स्पर्धा, महामंडळात वाढता राजकीय हस्तक्षेप, शासनाच्या सवलतींची प्रतिपूर्ती वेळेत न होणे, शासनाला विविध माध्यमांतून भरावे लागणारे कर, अवैध प्रवासी वाहतूक, नवीन गाडय़ांची खरेदी नसल्याने स्पेअरपार्ट व इतर बाबींवर वाढलेला खर्च, कंत्राटी बसेस घेतल्याने निर्माण झालेला गोंधळ, विविध सवलती, खासगी गाडय़ांच्या तुलनेत सुविधांचा अभाव यामुळे या तोटय़ात प्रत्येक वर्षी वाढ होताना दिसते.