|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » वीस हजार जणांच्या नोकऱया वाचवा

वीस हजार जणांच्या नोकऱया वाचवा 

वृत्तसंस्था/ मुंबई

कंपनीतील 20 हजार जणांच्या नोकऱया वाचवा, असे साकडे कर्जाच्या अरिष्टात सापडलेल्या जेट एअरवेज कंपनीच्या वैमानिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी घातले. तसेच 1,500 कोटींची आर्थिक मदत करावी, असे आवहनही स्टेट बँक ऑफ इंडियाला केले आहे.

डिसेंबर 2018 पासून जेट एअरवेज कंपनीच्या वैमानिक, अभियंते व अन्य कर्मचाऱयांना वेतन मिळालेले नाही. याप्रश्नी आंदोलन करण्याचाही निर्धार कर्मचाऱयांनी केला होता;पण रात्री उशिरा वैमानिकांनी आपले कामकाज बंद आंदोलन तात्पुरते मागे घेतले. याबाबत माहिती देताना कंपनीच्या वैमानिक संघटनेचे उपाध्यक्ष आदिम वालियानी म्हणाले, कंपनीची आर्थिक घडी बसविण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने आम्हाला 1500 कोटी रुपयांची मदत करावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याप्रश्नी तत्काळ निर्णय घेऊन 20 हजार कर्मचाऱयांच्या नोकऱया वाचवाव्यात, असे आवाहन आम्ही केले आहे.

आर्थिक संकटात सापडल्यामुळे कंपनीची केवळ 11 विमाने सध्या सेवेत आहेत. मुंबई-दिल्ली, दिल्ली-अमृतसर अशी सेवा सुरू आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी हतबल आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे जेट एअरवेजच्या कर्मचाऱयांचे लक्ष लागले आहे.