|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपाच्या थापा जास्त व विकास कमी

भाजपाच्या थापा जास्त व विकास कमी 

बेतोडय़ातील कोपरा बैठकीत रवी नाईक यांचा आरोप

वार्ताहर/ दाभाळ

भाजपा सरकारने मागील पाच वर्षांत थापा अधिक व विकास कमी केला. त्यांच्या खोटय़ा आश्वासनांना बळी न पडता राज्यातील तीन मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत व दोन्ही लोकसभा जागांवर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनाच निवडून द्या व केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आणण्यास सहकार्य करा असे आवाहन फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी केले. वैद्यनगर, बेतोडा येथील कोपरा बैठकीत ते बोलत होते.

शिरोडय़ातील काँग्रेसचे उमेदवार महादेव नाईक यांच्या प्रचारासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर महादेव नाईक, फोंडय़ाचे नगरसेवक रितेश नाईक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हेमंत सामंत, सुभाष फळदेसाई, निलेश गांवकर, प्रेमानंद शेटकर, व्ही. जी. परशुराम, प्रशांत मायणेकर, बेतोडय़ाचे पंचसदस्य दुर्गाप्रसाद वैद्य आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

भाजपाने सर्व सामान्य नागरिकांना अनेक आश्वासने दिली. परंतु एकाचीही पूर्तता केलेली नाही. 15 लाख रुपये प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर जमा करणे, काळा पैसा देशात आणण्याचे आश्वासन, बेरोजगारी निर्मुलन या सर्व थापा होत्या हे जनतेला कळून चुकले आहे. यापुढे नागरिकांनी सावध व्हावे व शिरोडय़ातून महादेव नाईक यांना तर दक्षिण गोव्यातून फ्रान्सिस सार्दिन यांना निवडून देण्याचे आवाहन रवी नाईक यांनी केले.

महादेव नाईक म्हणाले, आपल्या दहावर्षाच्या कार्यकाळात शिरोडा मतदार संघात झालेला विकास जनता विसरलेली नाही. या दहा वर्षांच्या तुलनेत सुभाष शिरोडकर यांच्या 24 वर्षांच्या कालावधीतील विकासाची तुलना करा. लोकांना फक्त पोकळ आश्वासने देऊन स्वत:चे व कुटुंबाचे कल्याण करणाऱयांना धडा शिकवण्याची हीच संधी आहे.

हेमंत सामंत, प्रशांत मायणेकर, जमीर अहमद, दुर्गाप्रसाद वैद्य यांनी महादेव नाईक यांना विजयी करण्याचे आवाहन केले. बैठकीला नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन अश्विन गांवकर यांनी केले.