|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » काँग्रेस रोडचे काम निकृष्ट

काँग्रेस रोडचे काम निकृष्ट 

स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी पाहणी करावी

प्रतिनिधी/ बेळगाव

काँग्रेस रोड स्मार्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता एका बाजूने खोदाई करून गटारी बांधण्यासह काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र काँक्रिट मजबूत होण्यासाठी रस्त्यावर पाणी मारण्याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले असल्याने रस्त्याचे काम व्यवस्थित होत नसल्याची टीका नागरिकांमधून करण्यात येत आहे.

 शहरातील प्रमुख रस्ते स्मार्ट सिटी योजनेमधून स्मार्ट करण्यात येत आहेत. यामध्ये गोगटे चौक ते तिसऱया रेल्वेगेटपर्यंतच्या काँग्रेस रोडचा समावेश आहे. काँग्रेस रोडवरील एका बाजूची वाहतूक बंद ठेवून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचे काम सुरू करून महिना झाला असून गटारी बांधण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र कॅन्टोन्मेंट परिसरातील गटारी आणि रस्ता करण्यास लष्कराने आक्षेप घेतला असल्याने सदर काम रखडले आहे. 

रस्त्याचे काम करण्यासाठी गोगटे चौकामधून अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्याचा दर्जा व्यवस्थित होत नसल्याची तक्रार होत आहे. सदर रस्त्याचा विकास करण्याकरिता स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 57  कोटीचा निधी खर्च करण्यात येणार आहे. रस्त्याचे सिमेंट काँक्रिट घट होण्यासाठी पाणी मारून सतत ओलावा निर्माण करण्याची गरज आहे.  याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे रस्ता उखडण्याचा धोका आहे. हा रस्ता पंधरा वर्षे टिकेल असे सांगण्यात येत आहे. पण निकृष्ट दर्जाचे काम झाल्यास रस्ता पंधरा वर्षे टिकेल का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.  स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी रस्त्याच्या दर्जाची पाहणी करावी अशी मागणी होत आहे.