|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कर्नाटकात पहिल्या टप्प्यात 66.21 टक्के मतदान

कर्नाटकात पहिल्या टप्प्यात 66.21 टक्के मतदान 

प्रतिनिधी /बेंगळूर :

सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्षांमध्ये चुरस असलेल्या दक्षिण कर्नाटकातील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये 66.21 टक्के मतदान झाले. दक्षिण कन्नड (मंगळूर) मतदारसंघात सर्वाधिक 77.22 टक्के तर बेंगळूर सेंट्रल मतदारसंघात सर्वात कमी 47.31 टक्के मतदान झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी 2.47 टक्के कमी मतदान झाले आहे. 241 उमेदवारांसह राज्यातील प्रभावी नेत्यांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. 23 मे रोजी मतमोजणी होणार असून या दिवशीच मतदारांचा कौल कोणाच्या बाजुने आहे, ह स्पष्ट होईल.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने मोठय़ा प्रमाणात जागृती करून देखील मतदानाची टक्केवारी घसरली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी या 14 मतदासंघांमध्ये 68.68 टक्के मतदान झाले होते. बेंगळूर शहरातील तिन्ही मतदारसंघांमध्ये मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र यावेळीही दिसून आले.

पायाभूत सुविधांच्या पुर्ततेची मागणी करून मतदानावर बहिष्कार, कार्यकर्त्यांमध्ये वादावाद, काही ठिकाणी मतदान मतदानयंत्रात बिघाड, मतदार यादीतून नावे गायब, पावसाचा व्यत्यय, वगळता कर्नाटकातील पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान पार पडले. आता दुसऱया टप्प्यात उत्तर कर्नाटकातील 14 मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

गुरुवारी सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. काही ठिकाणी मतदान सुरु होण्यापूर्वीच मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे मतदानाला विलंब झाला. मंडय़ा, के. आर. पुरम, चित्रदुर्ग, तुमकूर या ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडले. सकाळी संथगतीने मतदान झाले. सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 12 टक्के, दुपारी 1 वाजता 21 टक्के, 3 वाजता 50 टक्के, सायंकाळी 62 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचे प्रमाण वाढले.