|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » देशाच्या हितासाठी भाजपला मतदान करा

देशाच्या हितासाठी भाजपला मतदान करा 

सांखळी / प्रतिनिधी :

भारतातील होणारी ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक असून देशाचे सरकार निवडताना देशाचा मान, सन्मान, अभिमान, स्वाभिमान कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय घेणारी, देशाच्या सीमा कुणाच्या हातात द्यायच्या, तसेच शेवटच्या माणसापर्यंत विकास कोण करू शकतो याचा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे. प्रत्येकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या महान कार्याची दखल घेताना भाजपाला बहुमतांनी विजयी करून देश मोदीजींच्या मजबूत व सुरक्षित हातात द्या, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांखळीत केले.

काँग्रेसकडून गेल्या 55 वर्षांत काय केले ?

काँग्रेसने गेल्या 55 वर्षांत अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार दिला. गरिबी हटवण्याची भाषा करणाऱया काँग्रेस नेत्यांनी 55 वर्षात कसले कार्य केले ते सांगावे, असा सवालही फडणवीस यांनी व्यक्त केला.

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची शान, मान उंचावताना जागतिक स्तरावर भारताचे वैभव वाढवून झपाटय़ाने वाढणारी अर्थव्यस्था असलेला देश अशी प्रतिमा निर्माण केली आहे. भारताबरोबरच  गोव्याचा  कायापालट व नवभारत व नवा  गोमंतक निर्माण करण्यात मोठे योगदान दिले आहे. गोव्याची नवनिर्मित करताना पुलांचे जाळे, रस्ते, आधुनिक सुविधा, विमानतळ अश्या चौफेर क्षेत्रात विकासाला चालना लाभत आहे, असे ते म्हणाले. मनोहर पर्रीकर यांनी देशाच्या सेवेसाठी व गोव्याच्या विकासासाठी दिलेलं योगदान महान असून पाकिस्तानला अद्दल घडवण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. पंतप्रधान मोदींच्या आदेशानुसार पाकिस्तानच्या हद्दीत  घुसून  अतिरेकींचे तळ उद्ध्वस्त  करण्याचे  आदेश भारतीय सैनिकांना दिले. अन् या कारवाईनंतर जगात भारताची मान उंचावली.

देशासाठी मतदान करा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

देश जलदगतीने पुढं जात असून मोदांजी पुन्हा पंतप्रधान  होणार आहेत. मात्र त्यासाठी मोठी आघाडी मिळवून गोव्यातील दोन्ही खासदार दिल्लीत पाठवा, असा संदेश दिला. सर्वांगीण विकास हा आपला संकल्प असून त्यासाठी केंद्र व राज्य  सरकार मजबूत करणे व त्या माध्यमातून विकास करणे गरजेचं आहे, असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले.

सांखळी येथील गणेश मंडळाच्या  व्यासपीठावर  आयोजित या भाजपच्या प्रचार  सभेला मोठा प्रतिसाद लाभला. व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मंडळ अध्यक्ष प्रदीप गावडे, स्वाती माईणकर आनंद काणेकर, सुभाष फोंडेकर, अनिल होबळे, मंगलदास गावस,  विश्वंभर गावस, दयानंद बोर्येकर, सुभाष मलिक,  विठोबा घाडी, शुभदा सावईकर, गोपाळ सुर्लकर डॉ सरोज देसाई, सूर्यकांत गावडे, संघवी फडते, मनिला गावस, दुर्गादास नाईक, सुरेश कामत आदी उपस्थित होते.

अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

या जाहीर सभेत दिगंबर नाईक, अनिल भोसले, यशवंत देसाई, उमेश गावस, शांबा गावस, पूजा राणे आदींनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे मुख्यमंत्री डॉ.  प्रमोद सावंत यांनी स्वागत करून त्यांना पूर्ण सहकार्य देण्याची हमी दिली.

 स्वागतपर भाषणात स्वाती माईणकर म्हणाल्या, महिलांच्या सशक्तीकरणांसाठी  पुन्हा मोदींजी सत्तेवर येणे ही काळाची गरज असून खाण प्रश्न भाजपचं सोडवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने भाजपला मोठा पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.

भाजचेच उमेदवार विजयी होणार : लक्ष्मीकांत पार्सेकर

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले, देश हितासाठी पुन्हा मोदींजी  सत्तेवर  येणे ही काळाची गरज असून ज्या पद्धतीने मोदीजींनी देशाची शान जागतिक पातळीवर वाढवताना देश प्रथम ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात रुजवली. त्यामुळे आज भारत मोठी शक्ती बनली असून गोव्यातून दोन्ही जागांवर पुन्हा भाजचेच उमेदवार निवडून येणार यात तिळमात्र शंका नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची उणीव आज भासत आहे. गोवा प्रथमच त्यांच्या अनुपस्थितीत निवडणूक लढवीत आहे. सर्वानी संघटित होऊन पर्रीकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन त्यांनी केले 

मोदीजींनी केवळ पाच वर्षात करून दाखवले : श्रीपाद नाईक

 आयुषमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, मोदीजींच्या नेतृत्वाखाली गोव्याचा झपाटय़ाने विकास सुरु असून रस्ते, पूल, पायाभूत विकास केला. जागतिक पातळीवर देशाची मान उंचावली. जे काँग्रेसला 55 वर्षे जमेल नाही ते मोदीजींनी केवळ पाच वर्षात करून दाखवले. पुढील पाच वर्षात क्रांतिकारक पाऊले उचलून दूरदृष्टी ठेवून मोदीजी मोठी झेप घेणार आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा भाजपाला साथ देण्याचा निर्धार जनतेने केला असून लोकसभेच्या दोन्ही जागावर भाजपचे उमेदवार विजयी होणार आहेत, असे ते म्हणाले

खाण प्रश्न सोडविणार

खाण प्रश्न भाजपचं नेटकेपणाने सोडवणार असून मोदीजींनी त्याची प्रक्रियाही सुरु केली  आहे.  त्यामुळं  खाण  अवलंबितांनी  घाबरून  न जाता भाजपवर विश्वास ठेवावा. योग्य निर्णय घेतले जातील याची खात्री बाळगावी.  गेल्या 20 वर्षात जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. आता या पुढील पाच वर्षातही तोच प्रयत्न राहणार असून सर्वानी पुन्हा सहकार्य करावे, असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले. कार्यकर्ते हीच माझी शक्ती आहे, ती या वेळीही उपयोगात येणार आहे, असेही ते म्हणाले. सुभाष फोंडेकर यांनी आभार मानले.