|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पडळकरांच्या प्रचारार्थ आज ऍड. आंबेडकरांची तोफ धडाडणार

पडळकरांच्या प्रचारार्थ आज ऍड. आंबेडकरांची तोफ धडाडणार 

प्रतिनिधी/ सांगली

 सांगली लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपिचंद पडळकर यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. पडळकर यांच्या प्रचारासाठी स्वतः ऍड. प्रकाश आंबेडकर हे सांगलीत येत असून आज सायंकाळी सात वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर त्यांची तोफ धडाडणार आहे, अशी माहिती ब्रम्हदेव पडळकर यांनी दिली. ऍड. आंबेडकर यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे राज्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.

  ऍड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी दिवसभर दौरा केला आहे. कोल्हापूर, हातकणंगले मतदार संघानंतर शनिवारी सायंकाळी सात वाजता त्यांची सांगलीत आंबेडकर स्टेडियमवर सभा होणार आहे. सत्ताधारी भाजप व विरोधी कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा पंचनामा ऍड. आंबेडकर करतील. ऍड. आंबेडकर यांच्या सभेची  वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. ऍड. आंबेडकर यांची सभा बहुजन समाजामध्ये चेतना निर्माण करणारी ठरणार असून या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 राजकारणात प्रस्थापित घराणे व नेत्यांनी सामान्य जनतेला राजकारपासून व सत्तेपासुन दूर ठेवलेच मात्र विकासापासुन वंचित ठेवले आहे. विद्यमान खासदार संजय पाटील यांनी विकासाकडे दुर्लक्ष केल्याने जिह्यातील तरूण ,शेतकरी अडचीत आला आहे. कोणताही मोठा उद्योग नाही, आहे तो उद्योग वाचवण्यासाठी प्रयत्न नाहीत. शेतीला पुरेसे पाणी नाही. एकुणच सर्वच क्षेत्रात अडचणींचा डोंगर आहे. त्यामुळेच विकासापासून वंचित राहिलेल्या या लोकसभा मतदार संघाचा समतोल विकास करण्यासाठी जनताच आता पडळकरांच्या पाठीशी उभी राहीली आहे. ही उमेदवारी आता जनतेची झाली आहे.

  माजी आमदार प्रकाश शेंडगे, हरिभाऊ भदे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे राज्यातील नेते या सभेस उपस्थित राहणार आहेत. या सभेस मतदार संघातील जनतेने मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पडळकर यांनी पेले आहे.

 सभेसाठी जिल्हाभरातून येणाऱया वाहनांची पार्किंग व्यवस्था जिल्हापरिषद जवळ असणाऱया इमॅन्युएल स्कूलच्या मैदानावर करण्यात आली आहे. तर सांगलीवाडीकडील वाहनांची सोय आयर्विन पुलाजवळ असणाऱया वैरण बाजाराच्या आवारात करण्यात येणार आहे.