|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » 10 लाख 81 हजार मतदारांकडून दिग्गजांच्या राजकीय भवितव्याचा फैसला

10 लाख 81 हजार मतदारांकडून दिग्गजांच्या राजकीय भवितव्याचा फैसला 

विशेष प्रतिनिधी/ सोलापूर

देशात लक्षवेधी ठरलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काल मतदान झाले. या मतदारसंघातील एकूण 19 लाख 50 हजार 2 या मतदारांपैकी 10 लाख 81 हजार 386 (शेकडा 58.45 टक्के) मतदारांनी आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावत या मतदारसंघाच्या आखाडय़ामधील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि वंचित आघाडीचे नेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकर या दिग्गजांसह आखाडय़ातील 13 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला केला. दरम्यान, 3 मातब्बर उमेदवारांचा फैसला करताना या मतदारांनी कोणाला कौल दिला यासाठी उमेदवारांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि अभ्यासू हितचिंतकांकडून आकडेमोड सुरु झाली आहे. जातीधर्मावर आणि फुटाफुटीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत तिन्ही तगडय़ा उमेदवारांकडून विजयासंबंधी तर्क आणि अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.

तथापि, निवडणुकीच्या आखाडय़ामधील तुल्यबळ उमेदवार आणि त्यांच्या खास समर्थकांकडून विजयाचे दावे कितीही केले जात असले तरी सोलापूर लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत चुरशीत निवडणूक झाल्याने विजयाच्या संदर्भात ठोसपणे कोणीच सांगू शकत नाही हे वास्तव आहे. असे असले तरी सोलापूर लोकसभेच्या अक्कलकोट, शहर दक्षिण सोलापूर, शहर उत्तर सोलापूर, शहर मध्य सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा-पंढरपूर या सहाही मतदारसंघांमध्ये गावोगावी, वाडय़ावस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी, शेताशेताच्या बांधांवर एकूणच प्रत्येक ठिकाणी निवडणुकीचीच चर्चा रंगली असून प्रत्येकजण आपापल्या परीने विजयाच्या संदर्भात गणिते मांडून विजयासंबंधी दावा करु लागला आहे. प्रचाराच्या धुराळ्याने ज्या पध्दतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले होते, त्याप्रमाणे आता गुरुवारनंतर म्हणजेच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोण निवडून येणार? कोणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार या संबंधीच्या चर्चांनी अक्षरशः मतदारसंघात वातावरण ढवळून निघाले आहे.  

विजयासंबंधी लागल्या पैजा

सन 2014 च्या तुलनेत या खेपेस सन 2019 ला मतदानाची टक्केवारी वाढविण्यात जिल्हा प्रशासनाला फारसे यश आले नसले तरी 2014 च्या तुलनेत किंबहुना यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता या खेपेस प्रचंड चुरशीने मतदान झाले आहे. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर या दिग्गजांसाठी बऱयाच ठिकाणी तर अक्षरशः ग्रामपंचायतीप्रमाणे ‘काँटे की टक्कर’ झाली आहे. त्यामुळे विजयी कोण होणार याचा सरळसरळ अंदाज कोणालाच लागत नसल्याने कोणता उमेदवार विजयी होणार यावर आता ठिकठिकाणी पैजा लागल्या आहेत.