|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » युएईतील पहिल्या हिंदू मंदिराच्या कार्यास प्रारंभ

युएईतील पहिल्या हिंदू मंदिराच्या कार्यास प्रारंभ 

वृत्तसंस्था/ अबूधाबी 

 संयुक्त अरब अमिरातची (युएई) राजधानी अबूधाबीमध्ये पहिल्या हिंदू मंदिराचा ‘कोनशिला विधी’ कार्यक्रम शनिवारी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात या मंदिरासाठी भूमिपूजन केले होते. युएई हा भारताचा महत्त्वाचा सहकारी ठरला आहे. 

 हिंदू मंदिराचा कोनशिला कार्यक्रम शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सुरू झाला आणि यात युएई तसेच जगभरातील 2500 हून अधिक भारतीयांनी भाग घेतला आहे. बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीएपीएस)चे अध्यक्ष महंत स्वामी महाराज यांनी वैदिक परंपरेनुसार विधी पार पाडला. या समारंभाकरता भारताचे राजदूत नवदीप सूरी उपस्थित होते. युएईचे विदेश मंत्री शेख अब्दुल्लाह बिन जायेद अल नाहयान आणि सहिष्णुता मंत्री शेख नाहयान मुबारक अल नाहयान यांच्यासह जगभरातील सामाजिक तसेच आध्यात्मिक नेते कार्यक्रमात सहभागी झाले. 

 अबूधाबीचे वली अहद (युवराज) शेख मोहम्मद बिन जायेए अल नाहयान यांनी मंदिर उभारणीसाठी 13.5 एकर जमीन भेट दिली आहे. याचबरोबर युएई सरकारने मंदिर परिसरातच वाहनतळासाठी देखील आणखीन 13.5 एकर जमीन उपलब्ध केली आहे. 

मंदिराची रचना

शिव, कृष्ण आणि अयप्पा भगवानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात केली जाईल. मंदिर उभारणीकरता वापरल्या जाणाऱया दगडांवरील कलाकुसरीचे काम भारतात केले जाणार आहे. हे मंदिर दिल्लीचे अक्षरधाम मंदिर आणि न्यूजर्सी मधील एका निर्माणाधीन इमारतीच्या प्रारुपावर आधारित असणार आहे. या मंदिरात कलादालन, सभागृह, वाचनालय आणि व्यायामशाळेसह एक सांस्कृतिक परिसरही असेल.

महत्त्वाचा मित्र देश

युएईत सुमारे 26 लाख भारतीयांचे वास्तव्य आहे.  युएईच्या लोकसंख्येच्य तुलनेत हे प्रमाण 30 टक्के इतके आहे. 2017 मध्ये प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या अबूधाबीच्या युवराजांनी पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेला तणाव दूर करण्यास महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते.

शिक्षण विभागाकडून 180 खासगी शाळांना नोटीस

शुल्ककपात न केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशच्या शिक्षण विभागाकडून खासगी शाळांवर  कारवाई करण्यात आली आहे. कुल्लू जिल्हय़ातील सुमारे 180 शाळांनी वाढवलेले शुल्क कमी केले नाही. शिक्षण विभागाने अशा खासगी शाळांच्या संचालकांना दोन दिवसांचा कालावधीत देत ई-मेलवरून नोटीस पाठविली आहे.