|Monday, August 26, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कट्टरवादाने लंकेची होरपळ

कट्टरवादाने लंकेची होरपळ 

श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यामधील आठ साखळी बाँबस्फोटातील मृतांची संख्या 290 तर जखमींची संख्या पाचशेवर पोहोचली आहे. या घटनेनंतर धार्मिक दंगली उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली आहे. या स्फोटांना स्थानिक इस्लामी अतिरेकी संघटना नॅशनल तौहीद जमात जबाबदार असल्याचे सरकारी प्रवक्त्याने जाहीर केलेले आहे. अर्थात हा दहशतवादी हल्ला होईल अशी सूचना सरकारला पूर्वीच मिळूनही ती रोखता आलेली नाही हे दुर्दैव आहे. श्रीलंकेसारखा छोटासा बेटवजा देश ज्याची लोकसंख्या अवघ्या दोन कोटीच्या आसपास आहे, त्याचा गेल्या काही दशकांचा इतिहास हा रक्तरंजित असाच आहे. स्वतंत्र तामिळी राष्ट्राच्या विचाराने प्रेरित होऊन हिंसाचार घडविणाऱया लिट्टे या संघटनेने या देशाला अक्षरशः हैराण करून सोडले होते. दशकभरापूर्वी प्रभाकरनच्या मृत्यूसोबतच लिट्टेचा खेळ संपला होता. यानंतर तरी श्रीलंकेत शांतता नांदेल असे मानले जात होते. पण, तसे घडलेच नाही. लंकेची स्थिती दिवसेंदिवस बिघडतच चाललेली आहे. 70 टक्के सिंहली-बौद्ध असलेल्या या देशात 12 टक्के हिंदू तामिळी आहेत आणि जवळपास तितकेच मुस्लिम तामिळी आहेत. हिंदू तामिळींची स्वतंत्र राष्ट्राची मागणी होती. लिट्टेचा जन्म त्यातूनच झाला असला तरी मुस्लिम तामिळी या मागणीपासून दूर होते. पण, तरीही गेल्या काही वर्षांमध्ये बौद्ध सिंहली आणि मुस्लिमांमध्ये या देशात जे सुरू आहे त्याचे कारण काय? याचा विचार करता कट्टरवादाला खतपाणी घालणारे राजकीय नेतृत्व आणि वेळोवेळी निवडणुकांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करणारी वक्तव्ये आणि कृती करून बहुसंख्याकांची मते मिळवून देशात सत्तेवर येण्याची राज्यकर्त्यांची हव्यास या साऱयाला कारणीभूत आहे. रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न यामध्ये आगीत तेल ओतणारा ठरला आहे. म्यानमारमध्ये याबाबतीत घडणाऱया घडामोडींचाही लंकेत परिणाम होतो, यावरूनच कट्टरतावाद किती टोकाला पोहोचवण्यात या देशातील राजकारणी कारणीभूत आहेत याचा अंदाज यावा. राजेपक्षे यांच्या पक्षाने देशात सातत्याने ध्रुवीकरण केले आणि त्याचा परिणाम लंकेला भोगावा लागला हे तर स्पष्टच आहे. श्रीलंकेत झालेले बाँबस्फोट हे तौहीद या संघटनेने केले असले तरी त्यांना परदेशी शक्तींची मदत मिळाली असेल असे सांगितले जात आहे. अर्थातच हा इशारा इसिसच्या दिशेने आहे. पण, जोपर्यंत ठोस काही हाती लागत नाही तोपर्यंत कोणीही ते जाहीर करणार नाहीत. लंकेतील ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जगात कुठेही अशा घटना घडल्या तर त्याचा निषेधच झाला पाहिजे. पण, आपापली जात आणि धर्म, आपला राजकीय विचार लक्षात घेऊनच त्याचा वापर केला जातो. या हल्ल्याचा निषेध म्हणून आयफेल टॉवरचे दिवे विझवले गेले किंवा बिहारच्या गयामधील भिख्खूंनी कँडल मार्च काढला आणि शांततेसाठी प्रार्थना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा वापर करून राजकीय वक्तव्ये केली ज्याच्यावर श्रीलंकेत तीव्र पडसाद उमटत आहेत. कट्टरतावाद हा सर्वार्थाने गैरच. ज्या ज्या इस्लामी राष्ट्रांमध्ये कट्टर गटांनी आपले हातपाय पसरत पसरत हिंसेच्या मार्गाने सत्तांतर घडविले त्यांच्या देशांची सध्याची अवस्था काय आहे, याचा विचार केला तर हा कट्टरतावाद कोणाचेही भले करत नाही. माझाच धर्म, माझाच वंश श्रेष्ठ आणि त्या वंशाला किंवा धर्मालाच राज्य करण्याची परवानगी आहे किंवा बहुसंख्य आहे म्हणून त्यांच्या पद्धतीनेच हा देश चालला पाहिजे अशा विचाराने लोकांची माथी भडकवण्याचे कारस्थान जेथे जेथे रचले गेले त्या त्या देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली. एकाच जात किंवा धर्माची सत्ता आली तरी तो देश लुटून खाण्यात त्याच जाती-धर्मातील प्रबळ टोळय़ांमध्ये पुढे पुढे जुंपत जाते आणि त्यातून राष्ट्राच्या प्रमुखांचे खून, दहशतवादी हल्ले आणि सत्तांतर करण्यासाठी स्वतःच्याच देशात स्फोट, सशस्त्र क्रांती, हवाई हल्ले असे प्रकार होतात. अफगाणिस्तान, सिरिया या जवळच्या देशांचा विचार केला तर हे अधिक स्पष्ट होऊ शकेल. रशिया आणि अमेरिकेच्या शीतयुद्धातून आणि तेलसंपन्न राष्ट्रांवर वचक ठेऊन आपल्या देशाचे हित साधण्यासाठी त्यांनी मुस्लीम कट्टरतावादाला जन्म दिला आणि तोच राक्षस त्या दोन्ही देशांच्या आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या मुळावर उठला. अमेरिकेवरील हल्ला, इंग्लंडमध्ये होणारे दहशतवादी हल्ले असोत किंवा जगातील कोणत्याही कोपऱयातील अस्थिर स्थिती असो त्यामागील राजकारण हे साम्राज्यवादासाठी, वर्चस्ववादासाठी आणि अतिरेकी लाभ ओरबडण्यासाठी केल्याचेच लक्षात येते. या सगळय़ांमुळे जग अस्थिर बनलेले आहे. त्याचे परिणाम कधी श्रीलंकेला, कधी भारताला तर कधी संपन्न राष्ट्रांना भोगावे लागतात. चीनसारखा देश भारताला शह देण्यासाठी श्रीलंका, पाकिस्तान अशा देशांना प्रचंड कर्जे देतो आणि नंतर त्याच्या वसुलीसाठी त्यांच्या देशातील बंदर ताब्यात घेणे, आपल्या देशाचे टीव्ही कार्यक्रम तिकडे लावायला लावणे असे प्रकार करून त्या त्या देशाचे सार्वभौमत्व संपुष्टात आणायला सुरू करतात. नंतर अशा शक्तीशाली देशाला विरोध करणे या राष्ट्रांच्या आवाक्याबाहेरचे होऊन जाते. जो सत्ताधारी त्याला विरोध करेल त्याला पदच्युत केले जाते. त्या देशात अस्थिरता माजवली जाते. दंगली, स्फोट घडू लागतात. हा खेळ चालवला जातो तो कट्टरतावादाच्या आडून. भारतातही हा कट्टरतावाद सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने कुरवाळला जात आहे. भारत या दुष्टचक्रात अडकू नये असे वाटत असेल तर होरपळणाऱया श्रीलंकेकडून आणि पश्चिम आशियातील प्रत्येक कट्टर इस्लामी राष्ट्रांचे जे वाटोळे झाले आहे त्या घटनांमधून बोध घेऊन मानवतेला प्राधान्य देण्याची गरज आहे. इस्लामी दहशतवादाचा बागुलबुवा दाखवून इथे नवे कट्टरतावादी घडवायचे नसतील तर श्रीलंकेतील घटनांमधून भारतीय नागरिकांनी बोध घेण्याची गरज आहे.