|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 9 खासदारांचा लागणार कस

9 खासदारांचा लागणार कस 

कर्नाटकात दुसऱया टप्प्यासाठी 14 मतदारसंघांमध्ये आज मतदान

प्रतिनिधी/ बेंगळूर

कर्नाटकातील दुसऱया टप्प्यासाठी 14 मतदारसंघांमध्ये मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उत्तर कर्नाटक भागातील 14 मतदारसंघांमधील 237 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. त्यामध्ये 9 खासदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने 28,022 मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. सुमारे 2,43,03,279 मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र आहेत.

दुसऱया टप्प्यासाठी उत्तर कर्नाटकात 14 मतदारसंघांपैकी 9 ठिकाणी विद्यमान खासदार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या खासदारांपैकी लोकसभेवर कोणाला संधी द्यावी, हे मतदार ठरविणार आहेत. शिमोगा, गुलबर्गा आणि उत्तर कन्नड (कारवार) या मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत. उत्तर कन्नडमध्ये भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे आणि निजदचे आनंद असनोटीकर यांच्यात निवडणूक आखाडा सज्ज झाला आहे. तर शिमोग्यात माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे पुत्र खासदार बी. वाय. राघवेंद्र आणि निजद नेते मधू बंगारप्पा यांच्यात तर गुलबर्ग्यात काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे आणि भाजप उमेदवार डॉ. उमेश जाधव यांच्यात चुरशीच्या लढती होणार आहेत. दुसऱया टप्प्यासाठी 28,022 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी 5,605 मतदान केंद्रे संवेदनशील तर 1,026 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. निवडणूक कार्यासाठी 2,03,591 कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. 216 सखी मतदान केंद्रे तर 37 दिव्यांग कर्मचारी सांभाळणारे मतदानसंघ आहेत.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

निवडणूक काळात बंदोबस्तासाठी 34,548 पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. अतीसंवेदनशील मतदान केंद्रांसाठी सीआरपीएफ जवान सुरक्षा पुरविणार आहेत. 1479 मतदान केंद्रांमध्ये वेबकास्टींगची सुविधा आहे. तर 1952 मतदार केंद्रांमध्ये चित्रिकरणाची मुभा देण्यात आली आहे. 

सिद्धरामय्या, येडियुराप्पांमध्ये प्रतिष्ठा पणाला

दुसऱया टप्प्यातील निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि येडियुराप्पा यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. बदामी मतदारसंघाचे आमदार असलेले सिद्धरामय्या बागलकोटमधील काँग्रेस उमेदवार वीणा काशेप्पन्नवर आणि कोप्पळमधील राघवेंद्र हिटनाळ यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर शिमोग्याचे खासदार आणि पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांना मोठय़ा मतांच्या फरकाने निवडून आणण्यासाठी येडियुराप्पा यांनी कंबर कसली आहे.  

या मतदारसंघांमध्ये होणार मतदान

चिकोडी, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी, हावेरी, धारवाड, उत्तर कन्नड (कारवार), दावणगेरे, शिमोगा