|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिह्यातील 55 जलप्रकल्प कोरडे ठणठणीत

जिह्यातील 55 जलप्रकल्प कोरडे ठणठणीत 

अमोल साळुंके/ सोलापूर

सोलापूर जिह्यात यंदा कमी पाउढस पडल्याने छोटे मोठे जलप्रकल्प देखील भरलेच नाहीत. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्यामुळे जिह्यातील 56 लघु जलप्रकल्प बंधाऱयापैकी 55 जलप्रकल्प कोरडे ठणठणीत पडले असून जलप्रकल्पांनी तळ गाठला आहे. त्यामुळे ग्रामस्त आणि जनावरांना पाणी मिळत नसल्याने पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शासन व प्रशासन लोकसभेच्या निवडणुकीत अजूनही व्यस्त असल्याने दुष्काळावरील उपाय योजना होत नसल्याचे चित्र सध्या सोलापूर जिह्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान, जिह्यात पाणी टंचाईची प्रचंड दाहकता वाढली असून लोक स्थलांतराच्या मनःस्थितीत आहेत.

    जिह्यातील 7 मध्यम तर 56 लघु जलप्रकल्प असून त्यामधून जिह्यातील विविध गावांना पाणी पुरवठा करण्यात येते. परंतु यंदा कमी पर्जन्यमानमुळे प्रकल्प पाण्याअभावी कोरडे पडल्याने तीव्र पाणी टंचाई भासत असून मे महिन्यांत आणखी याची दाहकता वाढणार आहे. एकरुख आणि आष्टी मध्यम जलप्रकल्पामध्ये थोडेसे पाणी असून मांगी, जवळगांव प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर हिंगणी, बोरी, पिंपळगांव ढाळे प्रकल्पामध्ये वजा पाणीसाठा तसेच बार्शी तालुक्यातील मधील कोरेगाव लघुप्रकल्पामध्ये पाणी उपलब्ध असून इतर जलप्रकल्प कोरडे पडले आहेत.

    एप्रिल महिन्यांतच तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस पेक्षा वर गेला आहे. यंदा पाऊस न पडल्याने व तापमान वाढ होत असल्याने पाण्याची पातळी झपाटय़ाने कमी होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत असताना नागरिकांना घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असून प्रशासन आणि शासन माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे. 

पाण्यासाठी वणवण भटकंती

सोलापूर जिह्यातील जवळ जवळ सर्वच प्रकल्प कोरडे पडल्यामुळे जिह्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ज्या प्रकल्पामधून गावांना पाणीपुरवठा येत होता ते प्रकल्पच कोरडे पडल्यामुळे नळाला पाणीच येत नाही. काही गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी या टँकरची दोन ते चार दिवस वाट बघावी लागते. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.