|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हाभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त

जिल्हाभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त 

प्रतिनिधी/ सांगली

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या पाच तुकडय़ासह जवळपास साडे चार हजार अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. बावीस मतदान केद्रावर एक चौकी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी दोन मिनीटात पोलिस पोहचतील अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निवडणूका निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हा पोलिस दलाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. आचरसंहीता लागू झाल्यापासून आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार जिह्यात घडला नाही. यापुढेही घडणार नाही असे सांगत पोलिस अधीक्षक शर्मा म्हणाले, आतापर्यंत तब्बल 4 हजार 900 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. जे लोक कारवाईपासून दूर आहेत. त्यांची माहिती काढण्यात येत आहे. त्यासाठी गोपनीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने ‘ऍक्टीव्ह’ करण्यात आली आहे.

पाच हजार अधिकारी, कर्मचाऱयांचा बंदोबस्त

शर्मा म्हणाले, निवडणूका शांततेच्या वातावरणात पार पडाव्यात, लोकांना भयमुक्त मतदान करता यावे यासाठी पोलिस दल काम करत आहे. त्यासाठी केद्रीय राखीव दलाच्या तीन तर राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ासह जवळपास साडे चार हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 1 हजार 400 होमगार्ड, जिल्हा तसेच जिह्याबाहेरील 3 हजार 500 अधिकारी व कर्मचाऱयांचा समावेश आहे. मतदान संपेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन व  नाकेबंदीही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जवळपासएक हजार परवानाधारकांकडून पिस्तुल ताब्यात घेण्यात आले आहेत. तर आठ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

प्रत्येक 22 केंद्रासाठी एक चौकी

जिह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त असेलच. मात्र, अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर जादा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. तसेच 22 केंद्रासाठी एक चौकी तयार करण्यात आली आहे. कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडला तर दोनच मिनिटात पोलिसांची फौज त्याठिकाणी पोहचतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूकीत पैलवानांचा गैर वापर होऊ नये यासाठी जिह्यातील तालीम आणि तेथील पैलवानांची माहिती काढण्यात आली आहे.